Ahmedabad Plane Crash : 10 बाय 10 च्या खोलीतून आकाशात भरारी.. पण रोशनीचं स्वप्न अपघातात विझलं! मामांना अश्रू अनावर
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात डोंबिवलीतील 27 वर्षीय एअर होस्टेस रोशनी सोनघरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिचे कुटुंब आणि डोंबिवली शहर शोकमग्न आहे. रोशनी एअर इंडियात कार्यरत होती आणि तिच्या स्वप्नांचा प्रवास अचानक थांबला. तिच्या मामांनी हृदयद्रावक आठवणी सांगितल्या, ज्यात तिचे बालपण आणि तिचे एअर होस्टेस होण्याचे स्वप्न समाविष्ट आहे. एअर इंडियाकडून कुटुंबाला अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही.

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात डोंबिवलीतील एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण डोंबिवली शहर शोकमग्न आहे. ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. मात्र काल दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. रोशनी सोनघरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत सोबत राहत होती. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे नातेवाईकांना शोक अनावर झाला असून तिच्या आठवणीत मामांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.
रोशनीच्या मृत्यूनंतर तिचे मामा प्रवीण सुखदरे यांनी साश्रू नयनांनी भावना व्यक्त केल्या. “ती आमच्या अंगाखांद्यावर खेळली, डोळ्यांसमोर मोठी झाली. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं… पण नियतीने तिच्यावर अन्याय केला.” असे ते म्हणाले.
10 बाय 10 च्या खोलीतून आकाशात भरारी पण…
डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे या एअर इंडिया फ्लाइट क्रूच्या तरुणीचा काल अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिच्या मामाने हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण सुखदरे असे त्यांचे नाव आहे. “रोशनी आमच्यासमोर मोठी झाली. 10 बाय 10 च्या छोट्याशा खोलीतून तिने मोठ्या आकाशात झेप घेतली. तिला बालपणापासूनच एअर होस्टेस बनायचं होतं. तिच्या वडिलांचं टेक्निशियनचं काम असूनही आई-वडील दोघांनीही ती मोठी व्हावी, शिकावी यासाठी खूप कष्ट घेतले. सुरुवातीला रोशनी स्पाइस जेटमध्ये होती. दोन वर्षांपूर्वी तिने एअर इंडिया जॉइन केलं. दोनच दिवसांपूर्वी ती गावी आली होती. आजी-आजोबा, काका-काकूंना भेटली, कुलदैवताचं दर्शन घेतलं. आणि तेवढ्यात तिला लंडनची फ्लाइट मिळाली. तीच अखेरची भेट ठरली ” असं सांगताना त्यांना हुंदका अनावर झाला.
नियतीने काही वेगळंच ठरवलं
त्या आठवणी सांगताना ते भावुक झाले. “एक आठवड्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं. मी तिला लग्नाचं विचारलं होतं , तर ती म्हणाली होती – ‘मामा, मला जो आवडेल त्याच्याशीच लग्न करणार.’ पण नियतीने काही वेगळंच ठरवलं…” रोशनीची आई लो बीपीच्या त्रासाने ग्रस्त असल्याने, तिच्या मृत्यूची बातमी अद्याप त्यांना सांगण्यात आलेली नाही. तिचा भाऊ विघ्नेश हा सध्या शिपवर आहे. वडील, भाऊ आणि मोठी वहिनी अहमदाबादला पोहोचले आहेत, असंही मामांनी सांगितलं.
“डोंबिवलीकरांनी खूप सहकार्य केलं. मात्र अद्याप एअर इंडियाकडून कोणालाही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एअर इंडियाचे काही सहकारी मात्र कुटुंबासोबत आहेत.” असं सुखदरे म्हणाले.
हसत्या खेळत्या, 27 वर्षांच्या रोशनीच्या मृत्यूचं दु:ख शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे, पण रोशनीची झेप, तिचं स्वप्न आणि तिचं आयुष्य आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात घर करून राहिलं आहे.