माझी बहीण मंत्रिमंडळात, शेतकऱ्यांना…. धनंजय मुंडेंची दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा
कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथे आलेला प्रत्येक जातीपाती धर्माचा, बाबांचा भक्त, मुंडेसाहेबांचा अनुयायीला कोणी संपवू शकत नाही. दहा जन्म संपवता येणार नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसरा मेळाव्यानंतर आता राज्यातील दुसरा दसरा मेळावा पार पडत आहे. सावरगाव येथील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडत आहे. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच भगवान गडावर हा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे तिघेही एकत्र मंचावर उपस्थित आहेत. या मेळाव्यावेळी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.
प्रितम ताईंनी त्यांच्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख करावा. की आजपर्यंत मुंडे साहेबांच्या दसऱ्या मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा कोणता असेल तर तो आजचा आहे. मी सर्वांसमोर नतमस्तक होतो. तुम्ही एवढं प्रेम मुंडे कुटुंब आणि पंकजा ताईंवर दाखवलं. अभूतपूर्व पाऊस आला. पूर आला. शेतकऱ्यांच्यासमोर भयंकर संकट आलं. तसं संकट आलं असताना माझी आणि ताईची चर्चा झाली. काय करायचं? पण ताईंनी सांगितलं की, या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार
मी ताईंचे आभार मानतो. आज शेतकरी अडचणीत आहे. इथे आलेला प्रत्येकजण शेतकरी, शेतमजूर आहे. मी मंत्रिमंडळात नाही. फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मोठी घोषणा धनंजय मुंडेंनी केली.
मुंडेसाहेबांचा अनुयायीला कोणी संपवू शकत नाही
दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा हे फक्त घोषणा देणाऱ्यांना कळणार नाही. दसरा मेळावा कधी सुरू झाला आणि कधी नाही हे माहीत नाही. दसऱ्याच्या दिवशी भगवान गडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलं. त्या दिवसापासून या दसऱ्या मेळाव्याची परंपरा आहे. या मेळाव्याला देशाच्या नकाशावर नेलं असेल तर ते गोपिनाथ मुंडेंनी. आजही डोळ्यात पाणी येतं. हा मेळावा जगाच्या नकाशावर नेला. मला माझ्या बहिणींचा अभिमान वाटतो. साहेब गेल्यावरही असंख्य अडचणीनंतरही तुम्ही ही परंपरा सुरू ठेवली. मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही लहान होतो, आमच्या हाताला बोटाला धरून साहेब भगवान गडावर न्यायचे. साहेब नेहमी म्हणत की, ही विचारांची देवाणघेवाण आहे. मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो. मागे बघितलं. मागच्या दसऱ्याला मी होतो. त्यातील अनेकजण आज दिसत नाहीत. म्हटलं का? पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. पण एक लक्षात घ्या, कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथे आलेला प्रत्येक जातीपाती धर्माचा, बाबांचा भक्त, मुंडेसाहेबांचा अनुयायीला कोणी संपवू शकत नाही. दहा जन्म संपवता येणार नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
