
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांनी आपल्या स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे, अनेक नाराज पदाधिकारी आणि नेते निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीलमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये पक्षप्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आता पुन्हा एकदा आणखी एक धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडांवर सुरू असलेली पक्ष गळती शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आणखी एका मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सगुण नाईक यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटातील मुंबई आणि अहिल्यानगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, मात्र दुसरीकडे स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांकडून स्वबळाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील संभ्रम पहायला मिळत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली असून, भाजपकडून विभागावार बैठका देखील घेण्यात आल्या आहेत, या बैठकांच्या माध्यमातून त्या विभागामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे.