Eknath Shinde : मराठी माणूस तुमच्यामुळेच मुंबई सोडून गेला… एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबई सोडून गेला असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यावेळी बोलताना शिंदे यांनी मुंबईकरांसाठी विकास योजना, परवडणारी घरे आणि मालमत्ता करातील सवलतींची घोषणा केली. मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना सन्मानाने परत आणण्याचे आश्वासन देत, त्यांनी ठाकरेंच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली.

Eknath Shinde : मराठी माणूस तुमच्यामुळेच मुंबई सोडून गेला... एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे
| Updated on: Jan 11, 2026 | 12:35 PM

महापालिका निवडणुकांसाठी अवघे तीन दिवस उरलेले असताना प्रचार, सभा, मुलाखतींना वेग आला असून विविध पक्षांकडून जाहीरनामेही प्रकाशित होत आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही अतिशय चुरशीची ठरत असून या महापालिकेसाठी महायुतीनेहीपा आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपा- शिवसेना शिंदे गटाचा ‘वचननामा’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या. तसेच त्यांनी ठाकरेंवर टीकाही केली. मुंबई तोडण्याचा आरोप केला जात आहे. पण मराठी माणूस तुमच्यामुळे मुंबई सोडून गेला असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

मी अडीच वर्ष तर देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपदाचं एक वर्ष असं आम्ही साडेतीन वर्ष काम केलं. आम्हाला मुंबईच्या विकासाचा वेग वाढवायचा आहे. मुंबईकरांचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे. वचनही आहे. मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर सन्मानाने मुंबईत आणायचा. हा मुंबईकर वसई विरार आणि कर्जत बदलापूर कसाऱ्यापर्यंत गेला. याला जबाबदार कोण. याचा जाब मुंबईकर पूर्वीच्या लोकांना विचारतील असं एकनाथ शिंदे म्हणाले

मुंबईत पागडी मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १०० वर्षापासून राहतात. पण लोक घर दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला. ओसी नसलेल्यांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागत होता. त्याचाही निर्णय घेतला आहे. झोपडपट्टी मुक्त करणार होते. पण ते झालं नाही. पालिकेत बसलेल्यांनी ते काम केलं नाही. वारसा सांगणाऱ्यांनीही केलं नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.

मुंबई आणि एमएमआरमध्ये घरे दिली. हक्काची घरे देण्याचं वचन दिलं आहे. मुंबईचा माणूस हद्दपार झाला आहे. त्यांना पुढे आणण्याचं काम करायचं आहे. मोदींनीही सर्वांसाठी घरे ही घोषणा केली आहे. ही संकल्पना पुढे नेण्यासाठी पाच वर्षात ३० ते ३५ लाख घरे निर्मिती करण्याचं काम करायचं आहे. चाळी आणि स्लममुळे मुंबईतील माणूस बाहेर जाऊ नये, बाहेर गेलेली लोकं परत यावं ही आमची योजना आहे. आम्ही इतरांची श्रेय चोरणार नाही. श्रेय घेणारी टोळी सक्रिय झाली आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर निशाणा साधला.

तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबई सोडून गेला

मुंबई तोडण्याचा आरोप केला जात आहे. पण मराठी माणूस तुमच्यामुळे मुंबई सोडून गेला असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी मुंबईला उभं करण्याचं काम केलं आहे. बीकेसीमध्ये फायनान्शियल सेंटर करत आहोत. काही लोक म्हणत होते गुजरातला गेलं. कुठं गेलं. कुठंही गेलं नाही असंही शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. महापालिकेच्या माध्यमातून या निमित्ताने काम करणार आहोत. बाळासाहेबांच्या नावाने वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेला संलग्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचेही शिंदे यांनी जाहीर केलं.