Eknath Shinde-BJP : दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचं नाही, असा करार…एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यावर भाजपकडे काय उत्तर?
Eknath Shinde-BJP : "महाराष्ट्र सर्वांचा आहे या ठिकाणी मराठीचा वाद करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. असा जो वाद करेल त्याला मराठी माणूस व महाराष्ट्राची जनता थारा देणार नाही. भाषिक वाद करणं योग्य नाही. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही" असं राज ठाकरेंसंदर्भात म्हणाले.

“विधानसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुती एक नंबरवर असेल. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत. देवा भाऊंच्या नेतृत्वात भाजपमध्ये येत आहेत. शिंदे यांची कोंडी करण्याचा हा प्रश्न नाही. त्यांनी देखील भाजप मधील पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला. एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आमच्याकडे येतात, हे त्या कार्यकर्त्यांचं स्वातंत्र्य आहे” असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले. “युतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. युती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. काही ठिकाणी युती होणार नाही तिकडे मैत्रीपूर्वक निवडणूक लढू. एकमेकांचे कार्यकर्ते फोडणे हा भाजपचा अजेंडा नाही” असं नवनाथ बन यांनी सांगितलं.
“भाजप मित्र पक्षांच्या डोक्यावर बसत नाही. मित्रांना सोबत घेऊन त्यांना हाताशी धरून पुढे जायचं काम करतो. बच्चु भाऊ पाच वर्षे जनतेच्या डोक्यावर बसलेले. त्यामुळे त्यांचा अचलपूरमध्ये जनतेने पराभव केला. लोकांच्या डोक्यावरून उतरण्याचं काम त्यांनी केलं. सबका साथ, सबका विकास याप्रमाणे सगळ्यांना एकत्र घेण्याचं काम भाजप करत आहे. बच्चू कडू देखील महायुतीत होते. मात्र सर्वात आधी बच्ची भाऊंनीच एकनाथ शिंदे यांची साथ सोडली. आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू यांनी भाजपवर टीका करण्याआधी एकनाथ शिंदे यांची साथ का सोडली? यासाठी आत्मपरीक्षण करावं” असं नवनाथ बन म्हणाले.
मविआला हद्दपार करणे हा भाजपचा अजेंडा
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार महायुतीमधील तिन्ही नेते बसतील. महाविकास आघाडीच्या विरोधात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील. यासाठी निकष बघून जागा वाटप होईल. मुंबईमधून महाविकास आघाडीला हद्दपार करणे हा भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा आहे. महायुतीचे नेते एकत्र येऊन तोडगा काढून जास्तीत जास्त जागा निवडून आणू महायुतीचा महापौर होईल” असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला.
हा प्रश्न शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांना विचारावा
“महाराष्ट्राच्या विकासासाठी जे पाठिंबा देतील, त्यांना भाजप सोबत घेण्याचे काम करते. भाजपमध्ये कायम पक्ष प्रवेश होत आहेत. डोंबिवलीत पक्षप्रवेश केले, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे” असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलं. “भाजप आणि शिंदे या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचं नाही, असा करार झाला असेल तर परवा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश कसा झाला? हा प्रश्न शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांना विचारावा” असं नवनाथ बन म्हणाले. “तुम्ही आमच्या पक्षातील काही लोक घेतली आणि तुमच्या पक्षात काही लोक आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वत्र महायुतीचा झेंडा फडकणार” असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला.
