Shivsena-NCP : एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने सुनील तटकरेंकडे फिरवली पाठ, शासकीय विश्रामगृहात एकत्र असूनही टाळली भेट
Shivsena-NCP : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असलं तरी स्थानिक पातळीवर खासकरुन कोकणात मात्र तसं नाहीय. नुकतीच शासकीय विश्रामगृहात याची प्रचिती आली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थांबले होते.

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहेत. महायुती सरकारचा कारभार सध्या सुरळीत सुरु आहेत. त्यांच्यात आपसात काही तीव्र स्वरुपाचे मतभेद दिसत नाहीत. पण एकनाथ शिंदे शिवसेना आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र स्पर्धा आहे. त्यातून काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कुरघोडीचं राजकारण घडतं. अजित पवार हयात होते, तेव्हा सुद्धा ही स्पर्धा होती. आता सुद्धा तीच स्पर्धा कायम आहे. खासकरुन कोकणात सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिंदेंच्या आमदारांमध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या बोलण्यामधून ते अनेकदा दिसून आलय. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदारही आहे. रायगडमध्ये स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे शिवसेनेचीही चांगली पकड आहे. महाड, अलिबाग, खालापूर, दापोली इथे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचं तटकरे यांच्याशी फारस जमत नाही. तटकरेंसोबत त्यांचे मतभेद वेळोवेळी दिसून आलेत. त्यामुळेच महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांना रायगडच पालकमंत्री पद सहज मिळालं नाही. त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. आता रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात शिंदेंचे मंत्री आणि सुनील तटकरे यांच्यात दुरावा दिसून आलाय.
भेट घेणं का टाळलं?
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनील तटकरे यांची भेट टाळली. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे तटकरे येताच योगेश कदम यांनी भेट टाळली. सुनील तटकरे यांच्याकडे योगेश कदम यांनी पाठ फिरवली. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सुनील तटकरे, योगेश कदम, नारायण राणे आणि उदय सामंत एकत्र आले होते. योगेश कदम यांनी सर्व नेत्यांची भेट घेतली. पण योगेश कदम यांनी तटकरे यांची भेट घेणं टाळलं याची जास्त चर्चा आहे. दापोली विधानसभा मतदार संघात कदम आणि तटकरे यांच्यात राजकीय वाद सुरु आहे. वादाच्या पार्श्वभूमीवरती योगेश कदम यांच्या पाठ फिरवण्याच्या घटनेला जास्त महत्व मिळतय.
