
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच सेनेच्या मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट बैठकीसाठी एकनाथ शिंदे हजर होते, मात्र शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. साप्ताहिक कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री हे मंत्रालयात आले, पण मात्र कॅबिनेट बैठकीसाठी पोहोचलेच नाहीत. निधी वाटप आणि सरकारमध्ये कुणी दाद देत नाही असं म्हणत या मंत्र्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते, मात्र शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या मंत्र्यांवर नाराज असल्याचे समोर आले आहे. काही मंत्री मुंबईत नव्हते अशी माहिती समोर आली आहे, मात्र काही मंत्री हे मंत्रालयात आले होते, मात्र ते बैठकीला गेले नाहीत. या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आगामी काळात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात होणारे पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचं काम रविंद्र चव्हाण करत असल्याची तक्रार या मंत्र्यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहितीही समोर आली आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आज डोंबिवलीतील प्रवेशावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे असं म्हणत गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले या मंत्र्यांना सुनावले असल्याचीही माहिती समोर आली आहे.