गोगावलेंची काल मंत्रिपदाची ऑफर, आज एकनाथ शिंदे थेट शरद पवार गटाच्या आमदाराच्या घरी, मोठी उलथापालथ होणार?
भरत गोगावलेंनी काल अभिजीत पाटील यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे थेट शरद पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यात काल शिंदे गटाचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. गोगावले यांच्या मंत्रिपदाच्या ऑफरनंतर एकनाथ शिंदे थेट आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढपुरात पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अचानक शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली. काल मंत्री भरत गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भरत गोगावले यांच्या ऑफरनंतर आज शनिवारी लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं.
भरत गोगावले काय म्हणाले होते?
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी गुरूवारी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना जाहीर ऑफर दिली होती. ‘आमच्या पक्षात तुमचे येणे झाले, तर थेट मंत्रीपद देऊ शकतो, अशी ऑफर गोगावलेंनी त्यांना दिली होती. पंढरपुरातील एका कार्यक्रमादरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना ही ऑफर दिली होती. मंत्री गोगावलेंच्या या ऑफरनंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.
पंढरपुरात शिंदे पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. तर पंढरपुरातील एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना झाली होती. या पाच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाख आणि शिवसेनेकडून 2 लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलीये. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात एकनाथ शिंदे यांनी ही मदत मृतांच्या कुटुंबीयांना दिली. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांची आस्थेने शिंदे यांनी चौकशी केली.
