
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मत मोजणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू असतानाच आता मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
प्रीतम चेउलकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. यामुळे शिवसेना शिंदे गटाला बळ मिळालं आहे, तर मनसेला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून आम्ही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रीतम चेऊलकर यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रीतम चेऊलकर?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला. मनसेमध्ये अनेक गोष्टी होत्या, आम्ही अनेक तक्रारी देखील केल्या, पण त्या वरपर्यंत काही पोहोचल्या नाहीत. म्हणून आम्ही मनसे सोडण्याचा विचार केला. दीड महीना आधीच पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता. आम्ही फोन करून अनेक नेत्यांना सांगितलं, मात्र आम्हाला कोणीही संपर्क केला नाही. नेत्यांकडे तक्रारी करून त्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणून आम्ही मनसेला रामराम केला, अशी प्रतिक्रिया यावेळी चेऊलकर यांनी दिली आहे.
दरम्यान सर्वच मनसैनिकांचं पक्षात स्वागत करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि तो मराठीच होणार, असं यावेळी बोलताना आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटलं आहे.