सभा, रॅली बंद, पण उमेदवार घरोघरी जाऊन…निवडणूक आयुक्तांनी नियमच सांगितला; आता मतदानाच्या आदल्या दिवशी…
राज्यात एकूण 12 जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा नियम सांगितला आहे.

Jilha Parishad Election 2026 : महानगरपालिकेनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन एकूण 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागेल. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा नियम खास नियम सांगितला आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर सभा, बैठका, रॅली यांना मनाई आहे. परंतु उमेदवार मतदारांना वैयक्तिकरित्या भेटू शकतो. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. यावेळी प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवारांकडून तसेच उमदेवराच्या समर्थकांकडून मतदानाच्या आदल्या दिवशी कथितपणे वाटल्या जाणाऱ्या पैशांविषयी निवडणूक आयोगाची भूमिका विचारली. यावर बोलताना, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आचारसंहितेच्या नियमाबाबत सांगितले. पैसे घरोघरी वाटण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या महापालिका आयुक्तांना पाठवतो. ते या तक्रारीचं निराकरण करतात, असे दिनेश वाघमारे यांनी सांगितले. तसेच साडेपाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. त्याबाबतचा नियम आहे. कलम ३७ नुसार पाच लोकं एकत्र येऊ शकत नाही. पण व्यक्तिगत कोणी एकमेकांच्या घरी गेला तर अडचण नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
एकटा उमेदवार घरोघरी जाऊन चर्चा करू शकतो
पुढे बोलताना प्रचाराच्या काही कॅटेगिरी आहेत. सभा, मिरवणूक, रॅली या सर्व बंद होतील. पण उमेदवार व्यक्तिगत घरोघरी जाऊ शकतात. व्यक्तीगट भेटीगाठी घेता येतात. नियम काहीच बदलले नाहीत. लोकसभा आणि विधानसभेतही तेच नियम होते. डोअर टू डोअर व्यक्तीगत जाता येते. एकटा उमेदवार घरोघरी जाऊन चर्चा करू शकतो. पाचपेक्षा जास्त लोकं डोअर टू डोअर गेले तर नियमभंग आहे. एकटा व्यक्ती गेला तर नियम भंग नाही, असा नियम वाघमारे यांनी सांगितला.
उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही
पैसे वाटप करणं हा गुन्हा आहे. जिथे पैसे वाटपाचं आढळलं तर गुन्हा दाखल करू, असे सांगत जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० किलोमीटर अंतरावर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. परंतु माईकचा वापर करता येणार नाही. तसेच उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही. हा २०१२चा आदेश आहे, असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणूक आयुक्तांनी सांगितलेल्या या नियमावर विरोधक काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
