MNS Raj Thackeray : ठाकरे बंधुंच्या युतीआधी शिंदेंकडून राज ठाकरेंना मोठा धक्का, एकनिष्ठ नेता सोडणार मनसे
MNS Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीची चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना धक्का दिला आहे. फुटीच्या काळातही राज ठाकरेंसोबत उभा राहिलेला एकमेव एकनिष्ठ नेता मनसे सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या चर्चा सुरु आहेत. दोन्ही बाजूंकडून एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत. ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल’ असं उद्धव ठाकरे काल पत्रकार परिषदेत बोलले. दोन्ही पक्ष प्रमुखांमध्ये चर्चा झाली का? या बद्दल कुठलीही ठोस माहिती नाहीय. मी तुम्हाला संदेश नाही, बातमी देईन असं उद्धव ठाकरे काल बोलले. ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होणार? याचं उत्तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच मिळेल. पण या युतीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे बंधुंच्या युतीआधी मनसेला एक मोठा धक्का बसला आहे. मनसेचे एकमेव निष्ठावान माजी नगससेवक राज ठाकरेंची साथ सोडणार आहेत. त्यांनी मनसेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेते प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मनसेसाठी धक्का आहे. कलिन्यातील मनसेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे सोमवारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवक फुटले. दिलीप लांडे यांच्यासह त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. पण संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी सुद्धा मिळाली.
2022 साली शिवसेना फुटल्यानंतर कोण कुठे गेलं?
पण आता संजय तुर्डे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी काही पदाधिकाऱ्यांसह ते शिवसेनेत प्रवेश करतील. 2022 साली शिवसेना फुटली. त्यावेळी ठाकरे गटात असलेल्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दोन नगरसेवक अजूनही ठाकरे गटात आहेत. आत एकमेव मनसेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे मनसेच्या 7 पैकी 5 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात आणि दोन शिवसेना ठाकरे गटात आहेत.
2017 साली निवडून आलेले मनसेचे सात नगरसेवक आता कुठे?
१) दिलीप लांडे (शिवसेना शिंदे गट)
२) अश्विनी अशोक माटेकर (शिवसेना शिंदे गट)
३) परमेश्वर कदम (शिवसेना शिंदे गट)
४) दत्ता नरवणकर (शिवसेना शिंदे गट)
५) अर्चना संजय भालेराव (शिवसेना ठाकरे गट)
६) हर्षला मोरे (शिवसेना ठाकरे गट)
७) संजय तुर्डे (शिवसेना शिंदे गटात सोमवारी पक्ष प्रवेश)
