राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनानंतर दबक्या आवाजात कसली चर्चा? चांदवडसह जिल्हाभरात कसली चर्चा ?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांचे नेतृत्वात कांद्याच्या दरासह महागाईवर रास्ता रोको करण्यात आला. मात्र त्यानंतर राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

चांदवड, नाशिक : सध्या चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात एका आंदोलनाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज चांदवड ( Chandwad NCP Protest ) येथे कांद्याच्या दरावरुन रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला आहे. याशिवाय महागाईचा मुद्दाही यावेळी हाती घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. हे आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार समोर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडले होते. त्यामुळे या आंदोलनाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या आंदोलनातून समीर भुजबळ ( Sameer Bhujbal ) यांनी किती तीर मारले याचीही चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये समीर भुजबळ हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ मोठ्या फरकाने मोदी लाटेत पराभूत झाले होते. त्यानंतर पुन्हा 2019 ला समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता.
त्यामुळे खासदारकी लढविण्याच्या ऐवजी समीर भुजबळ यांनी आमदारकी लढवावी अशी काही पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे अजून दीड ते दोन वर्षे निवडणुकीच्या धामधूमीला बाकी असली तरी तयारी सुरू झालीय का अशी चर्चा होऊ लागली आहे.
2009 पासून समीर भुजबळ हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला होत असते. ही चर्चा चांदवड, नांदगाव आणि येवला या मतदार संघाच्या भोवती फिरत असते.
यामध्ये येवला मतदार संघ हा समीर भुजबळ यांचे चुलते राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. तर दुसरीकडे सलग दोन वेळ विजय आणि एकदा पराजय झालेले पंकज भुजबळ यांच्यासाठी नांदगाव मतदार संघ सोडला जातो.
त्यामुळे समीर भुजबळ यांच्यासाठी चांदवड मतदार संघ फक्त चर्चेचा पुरता राहतो. तशी ती जागाही कॉंग्रेसकडे असते. मात्र, तरीही समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा गेल्या काही निवडणुकीपासून होत असते. त्यातच आता कांद्याच्या मुद्द्यावरून समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले आहे.
त्यामुळे हे आंदोलन एक ताकद होती का ? आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी होती का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होऊ लागली आहे. याशिवाय समीर भुजबळ हे नांदगाव मधूनही उमेदवारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंकज भुजबळ हे फारसे राजकारणात सक्रिय नाही. छगन भुजबळ यांच्यावरच नांदगाव मतदार संघाची भिस्त असते. तर पंकज भुजबळ यांच्या प्रचारात समीर भुजबळ हे अधिक सक्रिय असतात. त्यामुळे समीर भुजबळ हे मतदार संघाची चाचपणी तर करत नाही ना? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात केलेला चांदवड येथील रास्ता रोको, विशेष म्हणजे शरद पवार नाशिक दौऱ्यावर असतांना केलेले हे आंदोलन. याशिवाय आगामी काळातील चांदवड मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने अंदाज तर घेतला नसावा असाही कयास लावला जात आहे.
