सुवर्ण पावलं ते सुवर्ण राज मुकुट असा आहे लालबागच्या राजाचा राजेशाही थाट, पहिलं दर्शन
यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.

गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात धूमधडाक्यात साजरा केला जातो, गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस राज्यभरात उत्साहाचं वातावरण असतं, भक्त आपल्या लाडक्या बाप्पााच्या आगमनाची मोठ्या अतुरतेनं वाट पाहात असतात. मुंबईचा लालबागचा राजा हा देशभरात प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येत असतात. लालबागचा राजा हा मुंबईकरांच्या खास आकर्षणाचा विषय असतो. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात मोठी गर्दी होत असते.
गणेशोत्सव सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत, आज लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन झालं आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहाण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यावेळी लालबागच्या राजाचा मुकुट हा आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे.
अशी आहे लालबागच्या राजाची पहिली झलक
प्रत्येक वर्षी मुंबईच्या गणेशोत्सवाची सुरुवात ही लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनाने होते. आपल्या लाडक्या बाप्पाची पहिली झलक पाहाण्यासाठी दूरवरून भाविक येतात. लालबागचा राजा हा भक्तांच्या श्रद्धा आणि अस्थेचं केंद्र आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाप्रति भक्तांची श्रद्धा आहे.
यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळतोय. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचं हे फोटो सेशनसाठी होणारं पहिलं दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झालं आहे.
मुंबईत गणेशोत्सवाची धूम
मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लालाबागच्या राजाचं आज पहिलं दर्शन झालं. मानाच्या गणपतींचं आगमन होत आहे. मुंबईकर मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करताना दिसत आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
