ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला, शीतल आमटेंबद्दल पती गौतमची भावनिक पोस्ट

| Updated on: Jan 26, 2021 | 9:46 PM

गौतम यांनी शीतल यांच्या आठवणींना उजाळा देतानाच आपल्या मनातील वेदनाही व्यक्त केली आहे. (Gautam Karajgi Special Birthday Wish to Dr. Sheetal Amte-Karajgi)

ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला, शीतल आमटेंबद्दल पती गौतमची भावनिक पोस्ट
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या दिवंगत  डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. या माध्यमातून गौतम यांनी  आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. गौतम यांनी शीतल यांच्या आठवणींना उजाळा देतानाच आपल्या मनातील वेदनाही व्यक्त केली आहे. (Gautam Karajgi Special Birthday Wish to Dr. Sheetal Amte-Karajgi)

गौतम करजगी यांची फेसबुक पोस्ट

प्राणप्रिय शीतल (सोना),

आज तुझा ४० वा वाढदिवस!
तू खूप दूर निघून गेली असलीस तरी अजूनही तू माझ्या जवळच आहेस,
तुला मिठीत घ्यावसं वाटतंय पण प्रिये…
तुला अशाप्रकारे येथून शुभेच्छा द्याव्या लागतील याची मी कधीच कल्पना केली नव्हती.

तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असं तुझं नेहमी सांगणं असायचं.

शीतल, तू माझ्यासाठी चमकता तारा राहिली आहेस आणि कायमच राहणार आहेस. तू मला आनंदवनाची ओळख करून दिलीस आणि त्याचवेळी अर्थपूर्ण जीवनाचं मोल काय असतं याची शिकवणही तू मला दिलीस. तू एक उत्तम लेक, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. बाबा आणि ताई यांनी जपलेल्या मूल्यांची तू सच्ची अनुयायी होतीस. मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस.

आज तुझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलचं संगोपन करेन. तू तुझ्या आयुष्यात जी मूल्ये जपली आणि जगलीस ती सारी मूल्ये शर्विलमध्ये उतरतील, याची काळजी मी घेईन. मला खात्री आहे की, तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील, ज्यांना आपल्या लेकीची काळजी आहे. जी माया आणि प्रेम आईवडिलांकडून त्यांच्या लेकीला मिळणं आवश्यक असतं ते तुला तिथे निश्चितच मिळेल.

मी नेहमीच माझ्या चमकत्या तार्‍याची वाट पाहत राहीन

तुझाच गौतम

शीतल आमटेंची आत्महत्या 

आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 ला आत्महत्या केली. शीतल यांचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले गेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करत मृतदेह शव विच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविला. यानंतर 4 डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याबाबतचा संपूर्ण अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे आनंदवनासह सामाजिक क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला.(Dr. Vikas Baba Amte Special Birthday Wish To Dr. Sheetal Amte)

चंद्रपूर पोलिसांनी डॉ. शीतल यांचे शव आढळलेल्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर डॉ. शीतल यांचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब या गोष्टी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. तसेच घराची झडती घेतेवेळी पोलिसांना घटनास्थळी तुटलेल्या अवस्थेतील सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे या आत्महत्येमागील गूढ वाढले होते.(Gautam Karajgi Special Birthday Wish to Dr. Sheetal Amte-Karajgi)

संबंधित बातम्या :

Special Story | डॉ. शीतल आमटे आत्महत्या : 30 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत काय काय घडलं? सविस्तर घटनाक्रमाचे 10 मुद्दे