जायकवाडीमुळे 1972 ला पाण्याखाली गेलेल्या गावाचं 2019 ला दर्शन

अहमदनगर : दुष्काळामुळे विविध ठिकाणचा जलसाठा संपलाय. वर्षानुवर्षे जलसाठा असलेल्या ठिकाणच्या काही गोष्टीही समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घेवरी गावाचं 48 वर्षांनी दर्शन घडलंय. गे गाव 48 वर्ष पाण्याखाली होती. मात्र आता दुष्काळामुळे पाणी आटलं आणि संपूर्ण गाव उघडं पडलं. गावातील पुरातन शिव मंदिर, वाडे, पाण्याचे हौद, पिठाची गिरणी , बाजार पेठा दिसू …

जायकवाडीमुळे 1972 ला पाण्याखाली गेलेल्या गावाचं 2019 ला दर्शन

अहमदनगर : दुष्काळामुळे विविध ठिकाणचा जलसाठा संपलाय. वर्षानुवर्षे जलसाठा असलेल्या ठिकाणच्या काही गोष्टीही समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घेवरी गावाचं 48 वर्षांनी दर्शन घडलंय. गे गाव 48 वर्ष पाण्याखाली होती. मात्र आता दुष्काळामुळे पाणी आटलं आणि संपूर्ण गाव उघडं पडलं. गावातील पुरातन शिव मंदिर, वाडे, पाण्याचे हौद, पिठाची गिरणी , बाजार पेठा दिसू लागल्या आहेत.

अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील घेवरी गाव 1972 साली गुण्या-गोविंदाने राहत होतं. पुरातन मंदिरे, वाडे, पाण्याचे हौद, पिठाची गिरणी, भव्य बाजार पेठा, जनावरांसाठी बांधलेले गोठे, जुन्या काळातील दगडी जाते, विहिरी, रांजण, संपूर्ण दगडी बांधकाम, अशा विविध रूपाने नटलेलं गाव 1972 पूर्वी पाण्याखाली गेलं. गावाच्या मंदिरांचं आणि जुन्या वास्तूचं आजही दर्शन होतं. मात्र त्याला कारण होतं जायकवाडी धरण. घेवरी गाव धरण बांधल्यानंतर पाण्याखाली गेलं आणि यंदाच्या भीषण दुष्काळाने गाव पुन्हा उघडं पडलंय.

1972 साली जायकवाडी धरण बांधण्यात आलं आणि घेवरे गाव धरणात गेलं. सरकारने संपूर्ण गाव अधिग्रहण केलं आणि गावाचं दुसरीकडे पुनर्वसन करण्यात आलं. मात्र त्यावेळी बांधलेले वाडे, पिठाच्या गिरण्या, गावातील पुरातन शिव मंदिर, पाण्याचे हौद, विहिरी, बाजार पेठा जश्याच्या तशा सोडून जाव्या लागल्या आणि संपूर्ण गाव 48 वर्षांपूर्वी धरणात बुडालं. या गावाचा आढावा घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांनी दोन किमी पाण्यातून प्रवास केला. या गावातील महादेव मंदिर पूर्ण उघडं पडलं असल्याचंही दिसून आलं. 48 वर्षांनी महादेवाचं दर्शन घडल्याने ग्रामस्थांनीही गर्दी केली.

काय आहे गावाचा इतिहास?

जायकवाडी धरण प्रस्थापित करण्यासाठी मराठवाड्या लगत असलेले शेवगाव तालुक्यातील चार हजार लोकसंख्या असलेले घेवरी गाव 1972 ला धरणाच्या मुख्य गाभाऱ्यात येत असल्याने 1971 मध्ये गावाला सरकारकडून पूर्व सूचना देण्यात आली. 1972 ला या गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. जायकवाडीत 1972 ला गेलेलं घेवरी गाव 2019 च्या दुष्काळाने पुन्हा समोर आलंय. शेवगाव तालुक्यातील दहीगावपासून 7-8 किमी अंतर असलेल्या या घेवरी गावाच्या 1972 सालच्या वस्तू आजही जशाच्या-तशा दिसत आहेत.

गावातील गढी गावच्या चौकातील चौफुला असलेला चक्र, मंदिरातील दगडी गाभारा, गढीवरील तिजोरी, शेजारील हौद आणि गावातील राजवाडे असलेल्या ठिकाणी दगडाचे ढीग आजही जागेवरच असल्याचं दिसतं. पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला हौदही उघडा पडलाय.

घेवरे गाव कसे होते याच्या आठवणी इथल्या नागरिकांनी सांगितल्या. हे सांगताना अनेकांना गहिवरुन आलं. आपलं गाव कसं होतं हे पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करू लागले आहेत.

1972 ला घेवरी गावाची लोकसंख्या चार हजार होती. 1970 ला या गावाचा जिल्हा परिषद सदस्य देखील होता. आजही घेवरी येथील 4-5 एकर गावठाण उघडे दिसू लागले आहे. घेवरी गावाच्या दोन्ही बाजूने नद्या होत्या. एका बाजूने शिवना रेडी आणि दुसऱ्या बाजूने गोदावरी या नद्या असल्याने आजच्या पेक्षा भयानक दुष्काळ जरी पडला तरी देखील या गावाला जाण्यासाठी होडीचाच वापर करावा लागत असे. जायकवाडीत गेलेल्या घेवरी गावाचे दहीगाव पिंप्री-शहाली, बाभुळखेडे, फत्तेपूर, घेवरी आणि पैठण तालुक्यातील घेवरी या पाच गावात आजमितीला पुनर्वसन करण्यात आले आहे. आपलं गाव दिसू लागल्याने पुनर्वसित झालेल्या गावातील नागरिक आज घेवरी पाहण्यसाठी गर्दी करत आहेत. या भीषण दुष्काळाने 48 वर्षांनी अनेकांना आपल्या गावाचं दर्शन झालंय. यामध्ये नव्या पिढीलाही आपलं गाव कसं होतं हे पाहायला मिळालं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *