कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, …त्या मागण्या कशा मान्य करायच्या? गिरीश महाजन मनोज जरांगेंबद्दल स्पष्टच बोलले
मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 14 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. दरम्यान त्यांनी आता मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस आहे. दरम्यान त्यांनी आता मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘जरांगे पाटलांना वेळोवेळी आमच्या सरकारचे शिष्टमंडळ भेटायला गेलेले आहे. आम्ही त्यांचं ऐकून घेतं आहे. 14 पैकी 12 मागण्या मान्य देखील झाल्या आहेत. प्रत्येक वेळी उपोषणाला बसल्यावर आम्ही त्यांना न्याय देखील दिलेला आहे. परंतु जात पडताळणी समिती रद्द करून टाका, यासारख्या ज्या मागण्या सनदशीर नाहीत त्या मागण्या कशा मान्य करायच्या? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येकवेळी वेगळी मागणी, कुठेतरी मागण्यांसंदर्भात देखील मर्यादा असली पाहिजे. कुठेतरी एकाच ठिकाणी अडून बसायचं, मला तरी हे योग्य वाटत नाही. मला वाटतं ते ज्या पद्धतीने मंत्री आणि मुख्यमंत्र्याबद्दल भाषा वापरत आहेत, आता त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. सनदशीर मार्गानेच या सर्वावर मार्ग निघेल. एवढ्या उच्च पदस्त पदावर असलेल्या लोकांना तुम्ही शिव्या देता, अशा शिव्या देऊन मार्ग निघेल का ? असंही यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असं हाय कोर्टाने म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करावी, अशा सूचना देखील हाय कोर्टाने दिल्या आहेत, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी आता आपली तब्येत सांभाळली पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. उपोषणाचा प्रकृतीवर परिणाम होतो, असंही ते यावेळी म्हणाले.
