माघार घेणार का? अखेर गोकुळ गीतेंनी सस्पेन्स संपवला, नाशिकच्या जागेविषयी सगळं सांगून टाकलं; काय ठरलं?
गोकुळ गीते यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासठी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न चालू आहेत. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची आणि गोकुळ गीते यांची नाशिकच्या ओझर विमानतळावर भेट झाली आहे.

Nashik Gokul Gite : सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर बंडखोरी झाली आहे. भाजपाचे नेते गोकुळ गीते यांनी काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी तसेच गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन तसेच शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे गीते यांच्या संपर्कात आहेत. परंतु अद्यापही गीते यांचे मन वळवण्यात यश आलेले नाही. दरम्यान, आता खुद्द गोकुळ गीते यांनीच समोर येत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिंब्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोकुळ गीते यांच्या भूमिकेमुळे महायुतीमधील नाशिकचा तिढा जास्तच वाढला आहे.
नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गीते यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासठी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न चालू आहेत. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची आणि गोकुळ गीते यांची नाशिकच्या ओझर विमानतळावर भेट झाली आहे. गीते यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच गुडन्यूज मिळेल, अशी आशा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
गोकुळ गीते यांची भूमिका काय?
तर मी दराडे यांना पाठिंबा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे, असे गोकुळ गीते यांनी सांगितले आहे. “त्यांनी मला आपण दराडे यांना पाठिंबा देऊ शकता, असे सांगितले. परंतु मी त्यांना संंबंधित उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नाही, असे सांगितले. मतदारांचा कौल हा माझ्या बाजूने आहे. असे असताना महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे मतदारांचा घात करण्यासारखे होईल,” अशी भूमिका गोकुळ गीते यांनी स्पष्ट केली आहे.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
दुसरीकडे उदय सामंत यांनीदेखील गोकुळ गीते यांनीही लवकरच चांगला तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली आहे. या जागेच्या बाबतीत गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांशी, मी काल मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. त्यामुळे नाशिकची जागा जिंकण्याची आम्ही रणनीती आखू, असे सामंत म्हणाले. त्यामुळे आता गोकुळ गीते नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.