आझाद मैदानावरील जल्लोषात जरांगे-विखे पाटलांची सिक्रेट चर्चा, जरांगेंनी हळू आवाजात नेमकं काय सांगितलं?

मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत आलेल्या आंदोलकांकडून जल्लोष केला जात आहे. पण मंचावरच जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या कानात काय सांगितले असे विचारले जात आहे.

आझाद मैदानावरील जल्लोषात जरांगे-विखे पाटलांची सिक्रेट चर्चा, जरांगेंनी हळू आवाजात नेमकं काय सांगितलं?
MANOJ JARANGE PATIL AND RADHAKRISHNA VIKHE PATIL
| Updated on: Sep 02, 2025 | 4:59 PM

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करत होते. काहीही झालं तरी आता मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच अशी भूमिका त्यांनी घेतली. गणेशोत्सवाच्या काळात सुरू असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली होती. आता सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने सांगितल्यानुसार लवकरच हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला जाईल. तसेच सातारा गॅझेट लागू करण्यासाठी एका महिन्याचा वेळ सरकारने मागितला आहे. आझाद मैदानावरच या संदर्भातील घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, उपोषणाला हा ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर मंचावरच मनोज जरांगे यांच्या एका कृतीची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानात नेमका कोणता संदेश दिला? असे विचारले जात आहे.

राज्याच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. सरकारवर दबाव वाढत चालल्यामुळे तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही लवकरात लवकर मुंबई खाली करण्याचा आदेश दिल्याने सरकार दरबारी मोठ्या घडामोडी घडल्याय. काही ठोस निर्णय झाल्यानंतर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पटील, शिवेंद्ररराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे तसेच अन्य नेत्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा मुसदा जरांग यांना दाखवण्यात आला. यावेळी मंचावरच जरांगे यांनी हा सर्व मसुदा वाचला आणि या मसुद्यातील तरतुदी उपस्थित जनतेला वाचून दाखवल्या.

जरांगे यांच्या कोणकोणत्या मागण्या केल्या मान्य

मसुद्यात नमूद केल्याप्रमाणे राज्य सरकारने आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सातारा गॅझेटही महिन्याभरात लागू केले जाईल, असा शब्द मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे, तसेच कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही दिली जाईल. सरकारने घेतलेले हे सर्व निर्णय जरांगे यांनी मंचावर बसूनच मराठा आंदोलकांना वाचून दाखवले. त्यानंतर मराठा आंदोलकांनी सरकारचे हे निर्णय मान्य असल्याचे सांगत आपला विजय झाल्याचे जाहीर केले.

जरांगेंनी विखे पाटलांच्या कानात काय सांगितले?

जरांगे यांनी विजय झाल्याचे जाहीर करताच आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. जरांगे यांच्या नावाने घोषणा दिल्या. याच घोषणा चालू असताना मनोज जरांगे यांनी मात्र बाजूला बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात संवाद झाला. जरांगे यांनी विखे पाटील यांच्या कानात काहीतरी हळू आवाजात सांगितले. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील जरांगेंचे हळू आवाजातील शब्द ऐकले आणि काही वेळानंतर ते मंचावरून उठले. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या जल्लोषात जरांगे यांनी राधाकृष्ण विखेंना नेमके काय सांगितले याची चर्चा रंगली आहे. दोघांमध्ये चर्चेचा विषय काय होता? असे विचारले जात आहे.