शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी फरक पडत नाही…भाजप मंत्र्यांचे मोठे विधान
girish mahajan on rahul narvekar | शिवसेनासंदर्भात बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तर काय होणार? हा प्रश्न चर्चेला जात आहे. यावेळी भाजप मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी फरक पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चंदन पूजाधिकारी, नाशिक, दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात बुधवारी निकाल होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल येण्यापूर्वी वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना हे मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही, अजित पवार यांचे आमदार सरकारसोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष निकाल देतील, तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. निकालच्या पूर्वसंध्येला सर्वाच्या नजरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागल्या आहेत.
काय म्हणाले गिरीश महाजन
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरण शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. आता ते जो निर्णय देणार असतील तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्वाचा असणार आहे.
सर्व शिवसेना एका बाजूला
एकनाथ शिंदे यांच्या बाजूला संपूर्ण शिवसेना आहे. शिवसेनेचे झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले. परंतु या सर्व प्रकरणात भाजपचा संबंध नाही. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय उद्या येणार आहे. हा निर्णय राजकीय पक्षांसाठी परिणाम करणारा आहे. अध्यक्षांनी सुनावणी दरम्यान सर्वांचे ऐकून घेतले आहे. वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे.
सरकारवर परिणाम होणार नाही
आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तर सरकावर परिणाम होणार नाही. सरकार स्थिर राहणार आहे. आमच्याकडे 200 च्या वर आमदारांची संख्या आहे. शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी आमच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परंतु शिंदे यांच्याकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या शिवसेनाला काही होणार नाही.
