
काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं, शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपने या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. जरी भाजप हा राज्यात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक ठिकाणी भाजप बहुमतापासून दूर आहे. त्यांना जर सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा लागणार आहे, अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यामध्ये शिवसेना भाजप युतीचा महापौरपदाचा फॉर्म्युला ठरला आहे.
ठाणे हा शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 75 नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपचे 28 नगरसेवक आहेत. ठाण्यात कोणाचा महापौर होणार? आणि कोणाचा उपमहापौर होणार? याबाबतचा फॉर्म्युला आता समोर आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होणार आहे, तर भाजपचा उपमहापौर होणार आहे.
त्यानुसार आता शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्यानं आता ठाण्याच्या नव्या महापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौर म्हणून भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. ही निवड पहिल्या सव्वा वर्षासाठी असणार आहे, तर दुसऱ्या सव्वा वर्षामध्ये देखील हाच फॉर्म्युला कायम राहणार असून, शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होणार आहे, तर भाजपचा उपमहापौर होणार आहे.