Gudi Padwa 2026 LIVE : सातपुडा परिसरात अवकाळी पावसाने पिकांना धोका

Gudi Padwa 2026 Live Updates in Marathi : आज गुढी पाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात सगळीकडे शोभा यात्रांची धूम आहे. पण मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे नागरिकांच्या मनात तेल आणि LPG गॅस तुटवड्याची चिंता आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Gudi Padwa 2026 LIVE : सातपुडा परिसरात अवकाळी पावसाने पिकांना धोका
Tv9 Marathi
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 19, 2026 | 7:44 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Mar 2026 07:44 PM (IST)

    सातपुडा परिसरात अवकाळी पावसाने पिकांना धोका

    नंदूरबार येथील अवकाळी पावसासह गारपिटीच्या फटका सातपुडा येथील शेती पिकाला बसला आहे. धडगाव तालुक्यातील भमाना परिसरात गारांचा खच पडला असून जमिनीवर पांढरी चादर पसरली आहे. कडाक्याच्या उन्हात अचानक पारा घसरला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी आंबा पिकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती व्यक्त होत आहे.

  • 19 Mar 2026 07:29 PM (IST)

    सांगली जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा

    सांगली जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी मिरज तालुकयाला गारपीटीने झोडपून काढले आहे.सलगरे सह आसपासच्या परिसरामध्ये गारांचा तुफान पाऊस झाला आहे.

  • 19 Mar 2026 07:07 PM (IST)

    11 वरिष्ठ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

    01 डिव्हीसीएम, 01 एरीया कमिटी सचिव, 01 पीपीसीएम, 01 कमांडर, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 06 अशा एकूण 11 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या माओवाद्यांना एकत्रितपणे एकुण 68 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आतापर्यंत देशभरात एकूण 897 माओवादी सदस्यांनी 545 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.

  • 19 Mar 2026 06:51 PM (IST)

    संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरण, 3 दिवस उलटूनही आरोपी फरार

    संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणाला 3 दिवस उलटल्यानंतरही आरोपी अद्याप फरार आहे. सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला होता. पोलिसांकडून आरोपीचे रेखाचित्र जाहीर करण्यात आलं आहे. आरोपीची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं.

  • 19 Mar 2026 06:34 PM (IST)

    मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुढीपाडव्याचा सणाचा थाट

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ​ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांच्या सादरीकरणाने संपूर्ण विमानतळ परिसर दुमदुमला. ​देश-परदेशातील प्रवाशांना या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आणि मराठी आदरातिथ्याचं दर्शन घडलं.

  • 19 Mar 2026 06:34 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला अवकाळी पाऊसाने झोडपलं

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला अवकाळी पाऊसाने झोडपलंय. बार्शी तालुक्यातील ममदापूर, पांगरी, गोरमाळा आणि कारी या भागात गारांसह पाऊस पडत आहे. अवकाळी आणि गारपीटीमुळे कांदा, गहू, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

  • 19 Mar 2026 06:06 PM (IST)

    बीडमधील वडवणी तालुक्यात अनेक ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस

    बीडच्या वडवणी तालुक्यात अनेक भागात गारांसह जोरदार पाऊस पडत आहे. दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अनेक भागात कालपासून पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालं आहे.

  • 19 Mar 2026 05:55 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

    दिल्ली उच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला, माजी खासदार आणि भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) माजी नेत्या के. कविता यांच्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेत त्यांनी आपल्या नवीन राजकीय पक्ष, तेलंगणा प्रजा जागृतीच्या नोंदणीची मागणी केली आहे.

  • 19 Mar 2026 05:42 PM (IST)

    राज्यसभेतील 32 टक्के खासदारांवर फौजदारी खटले

    विद्यमान राज्यसभा खासदारांपैकी 32% खासदारांनी त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. विद्यमान 229 राज्यसभा खासदारांची एकूण संपत्ती 27,638 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

  • 19 Mar 2026 05:25 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी साधला संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तणाव कमी करून संवाद आणि राजनैतिक संबंधांकडे परतण्याची तातडीची गरज आहे. “या प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता आणि स्थैर्य वाढवण्यासाठी आमचा घनिष्ठ समन्वय सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे ते म्हणाले.

  • 19 Mar 2026 05:10 PM (IST)

    कच्च्या तेलाची स्थिती आणि रिफायनरीचे कामकाज सामान्य आहे – पेट्रोलियम मंत्रालय

    मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की कच्च्या तेलाची स्थिती सामान्य आहे. रिफायनरीचे कामकाजही सामान्य आहे. तेलसाठा संपलेला नाही. आम्ही सर्वांना एलपीजीवरून पीएनजीकडे वळण्याचे सातत्याने आवाहन करत आहोत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 1.25 लाख नवीन पीएनजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

  • 19 Mar 2026 04:54 PM (IST)

    परभणी : गॅस तुटवड्याचा किरकोळ हॉटेल व्यावसायिकांना फटका

    आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे किरकोळ हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. परभणी शहरातील वसमत रोड वर एका जिलेबी विक्रेत्याने अक्षरशः तापलेल्या उन्हामध्ये विटांची चूल मांडून जिलेबी तळायला सुरुवात केली आहे. गॅस उपलब्ध नसल्यमुळे जिलेबी विक्रेत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

  • 19 Mar 2026 04:40 PM (IST)

    भंडारा : चोरट्यांनी सोलर पॅनलची वायर चोरली, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

    भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोली गावात सोलर पॅनलच्या कनेक्टर वायर चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सात शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलच्या वायर व कनेक्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी 17 मार्च रोजीही पाच शेतकऱ्यांना अशाच प्रकारे फटका बसला होता. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

  • 19 Mar 2026 04:26 PM (IST)

    बीड : कर्झणीतील गावकऱ्यांचे पुनर्वसनासाठी तलावात बसून उपोषण

    बीड तालुक्यातील कर्झणी येथील गावकऱ्यांचा गेल्या 55 वर्षांपासून पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू आहे. 1972 साली अख्खं गाव तलावात गेलं. त्यावेळी शासनाने गायरान जमीन गावकऱ्यांना दिली, पुनर्वसनासाठी निधी मंजूरही झाला होता मात्र तो कुठेही खर्च झाला नाही. यामुळे शासनाने दिलेल्या जागेत शेती ऊसतोडी करून आणि मोलमजुरी करून गावकऱ्यांनी आपली पक्की घर बांधली. पण अचानक वन विभागाने घरं पाडण्यास सांगितले, घरं पाडली नाहीत तर आम्हाला कारवाई करावी लागेल असं वनविभाग गावकऱ्यांना सांगत आहे. यामुळे गावकऱ्यांनी आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करत तलावात एक दिवसीय लाक्षणिक सुरू उपोषण केले आहे.

  • 19 Mar 2026 04:14 PM (IST)

    धाराशिव जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले

    धाराशिव जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील धाराशिव आणि वाशी तालुक्यांमध्ये गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा, द्राक्ष, हरभरा, ज्वारी या पिकांनाही गारपीट आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

  • 19 Mar 2026 04:01 PM (IST)

    जळगावमधील बहाळ शिवारात गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान

    जळगावमधील बहाळ शिवारात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी परमेश्वर महाजन यांची पाच एकरावरील ज्वारी पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. काढणीला आलेले पीक वादळी वारा आणि गारपीटीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.

  • 19 Mar 2026 03:47 PM (IST)

     आखाती देशातील युद्धाची झळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला, बेकरी पदार्थांची निर्मिती थांबवली

     आखाती देशातील युद्धाची झळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसू लागली आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यामुळे कणकवलीमधील बेकरी पदार्थ  (आयटम ) बनवणे करण्यात आले आहे.  मस्का पाव, कटलेट अशा प्रकारचे काही पदार्थ (आइटम ) गॅसच्या  मदतीने बनवले जातात. आता हे पदार्थ तयार करणे थांबवण्यात आले आहे.
  • 19 Mar 2026 03:26 PM (IST)

    रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे केल्या शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या

    जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मांडल्या.  केळी निर्यातीसाठी जळगावातून केळीसाठी स्वतंत्र रेल्वे, जळगावातील केळी संशोधन केंद्राला अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करावे , कापसाचे नव्या आणि चांगल्या दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

  • 19 Mar 2026 03:03 PM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरासह तालुक्यात गारांचा पाऊस

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरासह तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतात असलेल्या कांदा, गहू, हरभरा , आंब्यासह इतर पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रात्री  शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला . मात्र आज दुपारी चिखली तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे ..

  • 19 Mar 2026 02:00 PM (IST)

    ब्रांदा येथे गुढीपाडव्यानिमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन

    ब्रांदा येथे गुढीपाडव्यानिमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. शोभा यात्रेत पारंपरिक वेशभूषेत तरुणाईंची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री राम, आणि एकवीरा आईच्या वेशभूशेत तरुण तरुणी उपस्थित आहेत.

  • 19 Mar 2026 01:45 PM (IST)

    पालखीला जाणाऱ्यांवर चूल पेटवून जेवण बनवण्याची वेळ

    आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा गॅस मिळत नसल्यामुळे याच गोष्टीची झळ बसली आहे. पायी पालखीला शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रे करून वर देखील चूल पेटवून जेवण बनवण्याची वेळ आली आहे.

  • 19 Mar 2026 01:30 PM (IST)

    रूपाली चाकणकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार- करुणा मुंडे

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करुणा मुंडे मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, जोपर्यंत रूपाली चाकणकर राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सोमवारपासून मंत्रालयासमोर मी आंदोलन करणार.

  • 19 Mar 2026 01:15 PM (IST)

    कुख्यात गुन्हेगार सीटू सिंह याच्यावर कठोर कारवाई

    नागपूरमध्ये कुख्यात गुन्हेगार सीटू सिंह याच्यावर यशोधरानगर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याची धिंड काढली. खून, प्राणघातक हल्ले, खंडणी आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत तो आरोपी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

  • 19 Mar 2026 01:00 PM (IST)

    नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात प्रकरणी संभाजी राजे भडकले

    रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे. संभाजीराजे भोसले यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कॅप्टन खरात प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

  • 19 Mar 2026 12:50 PM (IST)

    अशोक खरातप्रकरणी एसआयटी तपास

    राज्य शासनाचा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. खरातशी संबंधित तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आली आहे. SIT प्रमुख म्हणून महिला IPS तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरातील सरकारवाडा, नाशिक ग्रामीणमधील वावी आणि अहिल्यानगरमधील शिर्डी पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 19 Mar 2026 12:40 PM (IST)

    रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवासस्थानी गुढी

    भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील आपल्या निवासस्थानी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी दानवे कुटुंबीयांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.घरासमोर गुढी उभारून रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी विधीवत पूजा केली.गुढी पाडव्याच्या निमित्ताने कुटुंबीयांसोबत परंपरा जपत गुढीपाडव्याचा आनंद लुटण्यात आला.

  • 19 Mar 2026 12:30 PM (IST)

    जळगावात भव्य शोभायात्रा

    जळगावात हिंदू समाज बांधवांच्या वतीने गुढीपाडवा निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा मध्ये डोक्यावर कलश घेत महिला मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाल्या. वाजत गाजत लेझीमच्या तालावर नृत्य करत शोभायात्रेत सहभागी नागरिकांनी मराठी नववर्षाचा आनंद साजरा केला. शोभायात्रेत मुलींनी जिजाऊ माता राणी लक्ष्मीबाई वेशभूषा साकारल्या. घोड्यावर स्वार विद्यार्थिनींनी लक्ष वेधलं.

  • 19 Mar 2026 12:20 PM (IST)

    अंबरनाथमध्ये नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह!

    गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक वेशभूषेत शेकडो अंबरनाथकरांनी सहभाग घेतला. नगराध्यक्षा तेजश्री करंजुलेंनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.आज राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे.

  • 19 Mar 2026 12:10 PM (IST)

    धाराशीच्या लोहारा तालुक्यात अवकाळी ने 558 हेक्टरचे नुकसान

    धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 558 हेक्टर क्षेत्रावरील हंगामी पिके आणि फळबागा बाधित झाल्या आहेत.प्राथमिक माहितीनुसार, या गारपीटीत 904 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि फळबागांसह गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे.दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ताबडतोब पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून अहवाल सादर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या पार्श्वभूमीवर, बाधित शेतकऱ्यांकडून शासनाकडे त्वरित आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 19 Mar 2026 12:00 PM (IST)

    सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा?

    अमरावती शहरात काँग्रेसकडून एक अनोखे आंदोलन करण्यात आले. सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा? असे पोस्टर झळकले.राजकमल चौकात काँग्रेसकडून सिलेंडरचे प्रतिमात्मक पोस्टर लावण्यात आले. त्याची एकच चर्चा सुरू झाली. सिलेंडरच्या तूटवड्यावर काँग्रेसकडून अनोखा निषेध करण्यात आला.

  • 19 Mar 2026 11:56 AM (IST)

    जळगावात व्यवसायिक सिलेंडर वितरण बंद झाल्याने श्रीखंड, आम्रखंड विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम

    जळगावात व्यवसायिक सिलेंडर वितरण बंद झाल्याने श्रीखंड, आम्रखंड विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. व्यवसायिक सिलेंडर मिळत नसल्याने श्रीखंड तसेच आम्रखंड तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा कमी प्रमाणात श्रीखंड, आम्रखंड याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्याने आर्थिक नुकसान झालं आहे. आखाती देशाचे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिले दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 19 Mar 2026 11:46 AM (IST)

    अंबड तालुक्यात पुरवठा विभागाची छापेमारी; 17 घरघुती गॅस सिलिंडर जप्त

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने पुन्हा एकदा छापेमारी करत मोठी कारवाई केली. अंबड शहर, वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोलनाका परिसरात छापेमारी करत पूरवठा विभागाने जवळपास 17 घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक आणि हातगाड्या चालक बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर करत असल्यामुळे पुरवठा विभागाने त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला असून जप्तीची कारवाई सुरू केली.

  • 19 Mar 2026 11:36 AM (IST)

    धुळे शहरात एलपीजी गॅसचे भाव वाढल्याने रिक्षा चालकांनी वाढवलं भाडं

    धुळे शहरात एलपीजी गॅसचे भाव वाढल्याने रिक्षा चालकांनी भाडं वाढवलं आहे. धुळे शहरामध्ये एलपीजी गॅसवर चालणाऱ्या पाचशे रिक्षा असून गेल्या पंधरा दिवसापासून एलपीजी गॅस पंप चालकाने 75 वरून तब्बल 125 रुपये किलो गॅसची किंमत केली आहे. अचानक गॅसचे भाव वाढल्याने रिक्षा चालकांनीदेखील प्रत्येक सीटमागे दहा रुपये वाढवले आहेत.

  • 19 Mar 2026 11:26 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 75 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 53 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 19 Mar 2026 11:13 AM (IST)

    अशोक खरातवर कारवाई का केली नाही? रुपाली पाटील यांचा सवाल

    अशोक खरातवर कारवाई का केली नाही? वर्षभरापूर्वी याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. 58 महिला भोंदूबाबा खरातला बळी पडल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षासोबत असल्याने खरातची हिंमत वाढली, नाशिक भोंदूबाबाप्रकरणी रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सवाल उपस्थित केले आहेत.

  • 19 Mar 2026 11:08 AM (IST)

    राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उभारली गुढी

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर गुढी उभारण्यात आली आहे. राज ठाकरेंसह कुटुंबीयांकडून गुढीची पूजा करण्यात आली. मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा असेल.

  • 19 Mar 2026 10:55 AM (IST)

    अमरावतीत सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेसनं निषेधार्थ कटआऊट्स लावले

    सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा???…. राजकमल चौकात काँग्रेसकडून सिलेंडरचे प्रतीकात्मक पोस्टर… सिलेंडरच्या तूटवड्यावर काँग्रेसकडून अनोखा निषेध.

  • 19 Mar 2026 10:50 AM (IST)

    रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण ! चौशीसाठी अनमोल बिष्णोईला मुंबईत आणणार

    मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून बिष्णोईचा हस्तक शुभम लोणकर याने भाजप आणि काँग्रेस आमदारांना दिलेल्या धमक्यांचीही सरकारने गंभीर दखल घेतली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञाताकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहेत. याप्रकरणात एनआयएने अनमोल बिष्णोईला अटक केली असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली

  • 19 Mar 2026 10:37 AM (IST)

    महिला आयोगाच्या अध्यक्ष खोटं बोलत आहेत- राऊत

    महिला आयोगाच्या अध्यक्ष खोटं बोलत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मिनिटभरही पदावर राहू नये. नैतिकता दाखवत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  • 19 Mar 2026 10:30 AM (IST)

    पुण्यात खेडमध्ये बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या

    पुण्याच्या खेड तालुक्यातील जैदवाडीत बेपत्ता तरुणाचा डोक्यात-तोंडावर वार करून खून; तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

  • 19 Mar 2026 10:19 AM (IST)

    पंढरपूरमध्ये LPG टंचाईमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

    इराण आणि इजराइलच्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. पंढरपूरमध्ये एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून रिक्षाचालकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेकांनी पेट्रोलवर रिक्षा चालवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रवाशांनाही जादा भाड्याचा फटका बसत आहे याच पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास येणाऱ्या चैत्र यात्रेत रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे

  • 19 Mar 2026 10:10 AM (IST)

    चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग

    चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. 2 आठवडेआधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने रांग. सिलेंडरसाठी तासनतास रांगेत राहावं लागतंय, ग्राहकांच्या तक्रारी.

  • 19 Mar 2026 09:50 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईचा फटका “महाशब्दे” मेस बंद

    आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईचा फटका, चाळीसगावातील पन्नास वर्षांची “महाशब्दे” मेस बंद. कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत, सिलेंडर उपलब्ध नसल्याने मेस चालकांचा अखेर बंदचा निर्णय. मेस बाहेर “इंधन अभावी मेस बंद” असा फलक, पुरवठा सुरळीत झाल्यास पुन्हा सुरू करण्याचे संकेत. तीन पिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा खंडित, कोरोना काळातही सुरू असलेली मेस आता बंद पडली/ मेसमधील कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम, अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण. मेसवर अवलंबून असलेले विद्यार्थी, नोकरदार वर्ग अडचणीत, जेवणाची व्यवस्था विस्कळीत

     

  • 19 Mar 2026 09:40 AM (IST)

    डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘हास्य जत्रा’ टीमची हजेरी

    प्रभाकर मोरे, चेतना भट यांच्यासह ‘हास्य जत्रा’ कलाकारांचा सहभाग. शोभायात्रेत कलाकारांची उपस्थिती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. डोंबिवलीकरांना दिल्या नववर्षाच्या खास शुभेच्छा. “नवीन पिढीने संस्कृती जपावी” असा कलाकारांचा संदेश. उत्साहात सहभागी होत आनंद व्यक्त केला कलाकारांनी

  • 19 Mar 2026 09:30 AM (IST)

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धचा परिणाम टरबूज निर्यातीवर

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक प्रचंड वाढली असून मागणी घटल्याने भाव कोसळले आहेत. येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टरबूजाची लागवड केली होती. उत्पादनही चांगले आले; मात्र बाजारभाव मिळत नसल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे.
  • 19 Mar 2026 09:20 AM (IST)

    साई मंदिरात गुडीपाडव्याचा उत्साह

    साई मंदिरात आज गुडीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय… पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या निमित्ताने भाविकांची साईदर्शनासाठी मांदियाळी दिसुन येत आहे.साई मंदिराला आज आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असुन साई मुर्तीला कोटयवधींच्या सुवर्ण अलंकारासह साखरेच्या गाठीकडयांचे माळ परिधान करण्यात आली आहे…आज पंचागाचे विधीवित पुजन करून मंदिराच्या कळसावर गुढी उभारली गेलीय…

  • 19 Mar 2026 09:06 AM (IST)

    कॅप्टन अशोक खरातच्या मालमतांची झाडाझडती सुरू

    नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची रात्री तपासणी. याशिवाय मिरगावतील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयाची केली तपासणी. मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा असायचा राबता. महिलेच्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कॅप्टन खरात आहे अटकेत

  • 19 Mar 2026 08:58 AM (IST)

    अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू

    स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मालमतांची झाडाझडती सुरू. मागील काही वर्षात खरातने गोळा केली कोट्यावधींची माया. नाशिक शहरातील आलिशान बंगला, ऑफिससह पाथर्डी परिसरात कोट्यावधींची 30 एकर जमीन. सिन्नरसह ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीत देखील कोट्यावधींची जमीन. अशोक खरातने मागील काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा.

  • 19 Mar 2026 08:47 AM (IST)

    जे लोक वर्षभर भेटत नाहीत, स्वागत यात्रेच्या निमित्ताने ते भेटतात – श्रीकांत शिंदे

    डोंबिवलीकर आणि महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वागत यात्रेची सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने या स्वागत यात्रेत लोक सहभागी झाले आहेत. जे लोक वर्षभर भेटत नाहीत, स्वागत यात्रेच्या निमित्ताने ते भेटतात. दरवर्षी विकासाची संकल्पना असते. मतदार राजाला जास्तीत जास्त गोष्टी दिल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आमचं काम सुरू असतं असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

  • 19 Mar 2026 08:35 AM (IST)

    साई मंदिरात आज गुढीपाडव्याचा उत्साह

    साई मंदिरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या निमित्ताने भाविकांची साईदर्शनासाठी मांदियाळी दिसून येत आहे.साई मंदिराला आज आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून. साई मुर्तीला कोटयवधींच्या सुवर्ण अलंकारासह साखरेच्या गाठीकडयांची माळ परिधान करण्यात आली आहे.

  • 19 Mar 2026 08:21 AM (IST)

    मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी – देवेंद्र फडणवीस

    दरवर्षी प्रमाणे आपण आपलं नववर्ष साजरे करण्यासाठी आलो आहे. हा आपल्यासाठी मोठा उत्सव आहे. नवसंकल्प घेऊन आता पुढे जाऊ. पारंपरिक वेषात आपण येतात आणि या ठिकाणी भगवामय वातावरण झालं. ही गुढी भारताची गुढी आहे. मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी अशा शुभेच्छा देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 19 Mar 2026 08:18 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, बाजरी भुई सपाट. मराठी नव वर्षाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नव अस्मानी संकट. भाजीपाला व फळबागायतेचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान.

  • 19 Mar 2026 08:17 AM (IST)

    डोंबिवलीत स्वागतयात्रेत महिला रायडर्सचा जलवा

    पारंपरिक वेशात महिला रायडर्स व सायकलस्वारांचा मोठा सहभाग.मोटरसायकलवर गुढी उभारत अनोख्या पद्धतीने स्वागत.नव्या पिढीकडून परंपरेचे जतन; उत्साह दुणावला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा वेगळा सहभाग ठळक. डोंबिवलीत शोभायात्रेला आधुनिकतेची झलक.

  • 19 Mar 2026 08:15 AM (IST)

    ठाण्यात शोभायात्रा कुठे?

    गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिर या ठिकाणाहून पालखी सोहळा सुरुवात होणार. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह भाजप आमदार संजय केळकर ,निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के देखील उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात शोभा यात्रेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

  • 19 Mar 2026 08:14 AM (IST)

    डोंबिवलीत हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची धूम; मान्यवरांची उपस्थिती

    आयुक्त अभिनव गोयल, डीसीपी अतुल झेंडे, आमदार राजेश मोरे गणपती मंदिरात उपस्थित. पहाटे श्री गणरायाचे दर्शन; मान्यवरांचा लवकरच शोभायात्रेत सहभाग. ‘वंदे मातरम्’ १५० वर्षांवर आधारित यंदाची भव्य थीम. भागशाळा मैदानातून यात्रेला सुरुवात. शहरभर ढोल-ताशांचा गजर. 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. 100 हून अधिक संस्थांचा सहभाग.डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण.

आज गुढीपाडवा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा होतो. गुढी पाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभा यात्रा निघणार आहेत. या शोभा यात्रांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीच प्रदर्शन केलं जातं. विविध सामाजिक विषय मांडले जातात. नागपुरात तात्या टोपे नगर गणेश मंदिर पासून शोभा यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर शोभा यात्रेत सहभागी होणार आहे. डोंबिवलीत हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.‘वंदे मातरम्’ 150 वर्षांवर यंदाची भव्य थीम आधारित आहे. त्याशिवाय आज संध्याकाळी दादार शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सालाबादप्रमाणे गुढीपाडवा मेळावा होणार आहे. राज्यभरातून मनसैनिक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Follow Us