…तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्याचं खळबळ उडवून देणारं विधान!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यानंतर आता शिंदे यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने मुख्यमंत्रिपदावर मोठे विधान केले आहे.

Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना दुसरीकडे राज्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, असा दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तसा जाहीर दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंत भाजपा तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी मोठा दावा केला आहे.
…तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील
गुलाबराव पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना, ‘प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामाची झलक पाहिली असेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल की पुढच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील,’ असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असतील तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
‘लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होणार’
गुलाबराव पाटील यांच्या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. सध्या मुंबई महापालिकेची तसेच इतर 29 महानगरपालिकांची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे सध्यातरी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही दिवसांपूर्ी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील लवकरच मराठी माणूस भारताच पंतप्रधान होणार, असे भाकित व्यक्त केले आहे. त्यामुळेदेखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चांचे पेव फुटले आहे. या सर्व घडामोडी, दावे आणि प्रतिदाव्यांचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
