गुणरत्न सदावर्ते संतापले, पहिल्यांदाच सरकारविरोधात घेतली मोठी भूमिका, थेट एका एका मंत्र्याचं नाव घेऊन…
मोठी बातमी समोर येत आहे, गुणरत्न सदावर्ते यांनी या जीआरवरून नाराजी व्यक्त केली असून, सरकारकडे मोठी मागणी केली आहे. यामुळे नाराजी पसरू शकते असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाने शासकीय नोकरभरतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी वय, शैक्षिणक पात्रता किंवा परीक्षा शुल्कात सवलत घेतली आहे, अशा कोणत्याही उमेदवाराला आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाहीये, त्यांची निवड ही त्यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातूनच केली जाणार आहे. याचाच अर्थ जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने कुठल्याही प्रकारची सवलत घेतली असेल आणि त्याला जर ओपन कॅटगिरीमधील विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क असतील तरी देखील त्याची निवड ही आरक्षित जागांमधून होणार आहे, यापूर्वी त्याची निवड ही ओपनमधून केली जायची. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर आता समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
गुरुवारी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या स्वतःच्या धोरणाविरोधात जाऊन हा निर्णय झाला आहे. ओबीसी, भटके विमुक्त, एससी, एसटी, हा समाज एका गावातून दुसऱ्या गावात कामासाठी जातो, त्यामुळे त्यांची मुलं उशिरा शाळेत जातात. अधिकाऱ्यांनी सरकारची फसगत केली आहे. जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल हे मेरीट आहे. नव्या कायद्याने जी बंधन आणली गेली आहेत, त्याला कायदेशीर आधार नाही. कॅबिनेट नोटमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 पासून ते 2000 पर्यंतच्या जेटमेंटचा उल्लेख नाही. शिपाई पासून ते कलेक्टर पर्यंत प्रत्येक नोकरीचा कायदा आहे, या सर्व नोकऱ्यांना एक विशिष्ट नियुक्ती निमय आहे, आणि त्यावर राज्यपालांची सही आहे, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जर या तरतुदी कायद्यात नसतील तर जीआर कसा आणला जाऊ शकतो? कायद्याच्या विरूद्ध जाऊन सरकार जीआर काढू शकत नाही, हे नाराजी पसरवणारे आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या ब्रिफिंगमुळे कॅबिनेटमध्ये चुकीचा निर्णय झाला.
आम्ही सरकारच्या विरोधात नाही, जनरल मेरिटच्या विरोधात नाही. परंतु कायद्याच्या विरुद्ध कालचा निर्णय आहे. 14 मे रोजी निर्णय घेतला आहे पुढच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देऊ नये आणि पुनर्विचार करावा. शेकडो लोकांचे फोन येत आहेत, विद्यार्थी देखील फोन करत आहेत. ग्रुप तयार होत आहेत, त्यांच्या वतीने बोलण्यासाठी समोर आलो आहे. गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवाळ, पंकजा मुंडे , धनंजय मुंडे, संजय शिरसाट, गोपीचंद पडळकर यांना विनंती करत आहोत की या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे. सगळ्यांनी यावर बोलेले पाहिजे, लवकरच या संदर्भात मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.