Maharashtra News LIVE : केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन ‘यूझर आयडी’ फीचरची चौकशी करणार
Maharashtra News LIVE Updates : भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई, उपगरांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा नवा अंदाज
मुंबई, उपगरांसाठी हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, पनवेल या भागात पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस मुंबई, मुंबई उपगर तसेच कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
-
अमित शाह 9 जुलै रोजी राज्यांचे डीजीपी आणि विविध यंत्रणांसोबत बैठक घेणार
देशाला नक्षलवादमुक्त करण्याच्या मोहिमेनंतर, केंद्र सरकारचे पुढील प्रमुख लक्ष अवैध घुसखोरीवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 9 जुलै रोजी सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि देशाच्या सर्वोच्च सुरक्षा व गुप्तचर संस्थांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
-
-
गोहत्या बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
तामिळनाडू सरकारने, राज्यभरात गायी आणि वासरांच्या कत्तलीवर बंदी सुनिश्चित करण्यासाठी 1976 च्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या 27 मे च्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
-
अयोध्या: मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांची प्रकृती खालावली
अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना लखनौ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन ‘यूझर आयडी’ फीचरची चौकशी करणार
केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन ‘यूझर आयडी’ फीचरची चौकशी करणार आहे. ऑनलाइन फसवणूक वाढण्याच्या शक्यतेमुळे सरकार गोपनीयता आणि सुरक्षेच्या पैलूंचा अभ्यास करत असल्याचे वृत्त आहे. काही अनियमितता आढळल्यास, मेटाला नोटीस पाठवली जाऊ शकते.
-
-
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा झाड कोसळले; मोठी दुर्घटना टळली
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एम्स हॉस्पिटल रोडवरील बंगल्याच्या आवारातील मोठे आंब्याचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
मालेगाव : TET पेपरफुटी प्रकरणी वंचितचे आंदोलन
मालेगावात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या सम्यक विद्यार्थी आंदोलकांनी आंदोलन केले. MAHA TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
-
-
जालना : 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन
जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी कामांना मोठा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 61 हजार 867 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ दहा टक्केच पेरणी पूर्ण झाली. जून महिना संपून गेला तरीही जालना जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी पेरण्या केल्या नसून दमदार पावसाची प्रतीक्षा करत जिल्ह्यातील शेतकरी बांधव आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. आता 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बांधवांनी पेरणी करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केलं आहे.
-
मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सायन-पनवेल हायवे जुईनगर याठिकाणी जलमय झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
5 जुलैच्या बेमुदत उपोषणापूर्वी अण्णा हजारेंची उद्या वैद्यकीय तपासणी
5 जुलैच्या बेमुदत उपोषणापूर्वी अण्णा हजारेंची उद्या वैद्यकीय तपासणी
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये होणार सर्व आवश्यक तपासण्या
सकाळी 9.30 वाजता अण्णा रुबी हॉलमध्ये दाखल होणार
माहितीचा अधिकार नियमावली मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण
सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याने निर्णयावर ठाम
ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर तपासणीचा निर्णय
उपोषणादरम्यान प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य नोंद केली जाणार
-
शेतीचा वाद विकोपाला ; पुतण्याने तलवारीचा वार करत काकाच्या हाताची बोटं छाटली
बीडमध्ये शेतीचा वाद टोकाला गेला, ज्यामध्ये पुतण्याने आपल्या काकावर तलवारीचा वार करत हाताची बोट छाटली आहेत. तर पुतण्याने चुलत भावावर देखील तलवारीने हल्ला केला. ही घटना बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर गावात घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
-
अंबरनाथला पावसानं झोडपलं, रस्ते जलमय
अंबरनाथ शहरात आज दुपारपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण- कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळं या साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागल असल्याचं पहायला मिळत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी
वेद मंदिर परिसरातील नव्याने केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दर्जावर आक्षेप
निकृष्ट कामामुळे तयार रस्ता तोडून पुन्हा नव्याने करण्याचे आयुक्तांचे आदेश
कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले होते प्रश्न
दर्जेदार कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा प्रशासनाकडून स्पष्ट संदेश
-
श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शिवसेना युवा नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. श्रीकांत शिंदे हे किनवट तालुक्यातील सारखनी येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उदघाट्न करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदखेड पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यासह शेकडो सैनिकांना ताब्यात घेतलय. सर्व शिवसैनिकांना शिंदखेड पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवलंय.
-
पनवेलमधील पळस्पे फाटा रस्यावर साचलं पाणी
सध्या राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पनवेलमधील पळस्पे फाटा रस्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालक पाण्यातून आपला मार्ग काढत आहेत.
-
नेरूळमध्ये धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटचा दोन तरुणींना करंट लागला
पावसाचा तडाखा सुरू असतानाच नवी मुंबईतील नेरूळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एल.पी. ब्रिजखाली बिकानेरसमोर वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली असून, त्यातून विद्युतप्रवाह पसरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
पाणी साचल्याने सबवेमध्ये अडकली कार
नवी मुंबईत मुसळधार पाऊस. सानपाडा सबवेमध्ये साचले पाणी. एक चारचाकी गाडी अडकली. वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. नवी मुबंई महानगरपालिकेवर नालेसफाईवर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे
-
रस्त्यावर पाणी साचल्याने बदलापूर-कटाई रस्ता वाहतुकीसाठी बंद
रस्त्यावर पाणी साचल्याने बदलापूर कटाई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नेवाली नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे. वाहतूक पोलिसांवर वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
उपसभापतीपदी शिवसैनिक बसल्याचा आनंद- एकनाथ शिंदे
“कामगार चळवळीचा दमदार नेता म्हणून तुम्ही नावारुपाला आला आहात. उपसभापतीपदी शिवसैनिक बसल्याचा आनंद आहे. सचिन अहिर यांची उत्तम संघटक म्हणून ओळख आहे. सचिन अहिर हे कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारं नेतृत्त्व आहे. म्हणून गिरणगावात नेता म्हणून लोकांनी तुम्हाला स्वीकारलं. हे काही आपोआप घडत नाही. प्रसंगी वैयक्तिक इच्छा-आकांक्षादेखील दूर ठेवाव्या लागतात,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
दहीहंडीला दोन महिने बाकी, पण सचिन अहिर यांनी यशाची हंडी आताच फोडली- शिंदे
“बिनविरोध निवडणूक केल्यामुळे मी विरोधकांचे आभार मानतो. सचिन अहिर यांना आम्ही मतदान केलंय. त्यांनी नवीन जबाबदारी हाती घेतली आहे. दहीहंडीला अजून दोन महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आताच फोडली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
-
चळवळीतून तयार झालेलं नेतृत्त्व, अशी सचिन अहिर यांची ओळख- फडणवीस
“चळवळीतून तयार झालेलं नेतृत्त्व, अशी सचिन अहिर यांची ओळख आहे. गिरणी कामगार असो किंवा विविध ठिकाणच्या कामगारांचे प्रश्न मांडत त्यांनी कामगार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपलं बस्तान बसवलं. महाराष्ट्रात विधानसभेत ते सलग तीन वेळा निवडून आले. 2019 मध्ये पक्षातील परिस्थिती पाहून त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता”, असं फडणवीस म्हणाले.
-
सचिन अहिर हे निर्भिडपणे करणारे- फडणवीस
“विधान परिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड झाल्याबद्दल मी सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो. सचिन अहिर हे निर्भिडपणे करणारे आहेत. विरोधकरांनी परंपरा कायम राखत अर्ज माघारी घेतला. नीलम गोऱ्हे यांनी उपसभापदीपदाचा मान वाढवण्याचं काम केलं,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी थेट मुंबईत देणार धडक
सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून आक्रमक झालेले शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता थेट मुंबई गाठणार आहेत. राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून सांगली जिल्ह्यातील आक्रमक झालेले शेतकरी आता थेट मुंबईला धडक देणार आहेत. 7 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
-
सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती
विधान परिषदेच्या उपसभापदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
-
सोलापुरातील सलगर वस्तीतील 118 झाडे तोडल्याप्रकरणी मोठी कारवाई
सोलापुरातील सलगर वस्तीतील 118 झाडे तोडल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. वृक्षतोड केल्याप्रकरणी जागा मालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना 1 कोटी 22 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही मोठी कारवाई केली आहे. सोलापूर महानगरपालिका आणि वनविभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. 15 दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले असून दंड न भरल्यास जागेच्या सात – बारा उताऱ्यावर बोजा नोंदवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांनी तर चांदीचे 2 हजार रुपयाची घसरण. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 44 हजार 200 रुपये. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31हजार 750 रुपये
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘ऑपरेशन टायगर’वर प्रतिक्रिया
नरेंद्र मोदीमुळे भाजप टिकून आहे तर फोडाफोडीचे राजकारण हे अमित शाहांचे राजकारण आहे.
-
ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
SIR चा मोठा फटका पश्चिम बंगाल आणि बिहार यांना बसलाय, देशात घाणेरड्या पद्धतीने राजकारण सुरु, महाराष्ट्रात गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरु आहे. प्रश्न विकत घेण्याचा नाही तर विकलं जाणाऱ्यांचा आहे. आपण काय करतो, कुठपर्यंत जायचे काही मर्यादा आहे की नाही? जेव्हा तुम्ही विरोधक संपवतात तेव्हा तुमच्यात विरोधक तयार होतात. सत्ता गेल्यावर भाजपात पण अशी फोडाफोडी होईल. शहरांच्या उभारणीकडे कोणाचं लक्ष नाही. नरेंद्र मोदीमुळे फक्त भाजत टिकून आहे.
-
पावसाचा फटका APMC बाजारपेठेतील भाजीपालावर
नवी मुबंईत सकाळपासून पाऊस बरसत आहें या पावसाचा फटका apmc बाजारपेठेतील भाजीपालावर देखील झाला आहे. बाजारपेठेत गिऱ्हाईक नसल्याने दर कमी झाले आहेत.
-
एका तासाच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय
एका तासाच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय; अहिल्याबाई चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिक संतप्त. कल्याण-डोंबिवलीत गेल्या एका तासापासून पावसाचा जोर वाढला असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले. कल्याण-आग्रा रोड तसेच कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम. वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढत वाहने चालवावी लागत असून नागरिकांना मोठा त्रास. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नालेसफाई प्रभावीपणे होत नसल्याने पाणी साचत असल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट. सखल भागांसह रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर कायम राहिल्यास कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांत पाणी साचण्याची भीती;
-
अमृतसर एक्सप्रेसच्या एका डब्या खाली चाकानजीक धूर निघाल्याची घटना घडली
मुंबईहून अमृतसर कडे जाणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसच्या एका डब्या खाली चाकानजीक धूर निघाल्याची घटना घडली. अमृतसर एक्सप्रेस सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर आल्यानंतर एका डब्याच्या चाकाखाली धूर निघत असल्याचा प्रकार लक्षात आला. प्रकार लक्षात आल्यावर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षेच्या उपायोजना केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.. घटनेमुळे 25 मिनिटं एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर थांबून होती, परिस्थिती नियंत्रण आल्यानंतर एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला. रेल्वेच्या चाकांजवळ असलेल्या ब्रेक सिस्टीम मधील अतिरिक्त दर्शन आणि अति उष्णतेमुळे धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेला जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षकांनी दुजोरा दिला आहे
-
माझ्या नाराजीची चिंता तुम्ही काढून टाका -निलम गोऱ्हे
एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी माझा सन्मान केला. माझ्या मनातल्या नाराजीबद्दल तुमच्या मनात जेवढी चिंता आहे ती काढून टाका असं आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांचं काय चूक, काय बरोबर हे न्यायालय, सभापती आणि जनता यांच्या अखत्यारित आहे असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
-
आरोप करणं हे विरोधकांच कामच आहे – श्रीकांत शिंदे
आरोग्य शिबीर आणि काही पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजचा हा नांदेड दौरा आहे. तोकडी कर्जमाफी दिली असं विरोधक बोलतात, आरोप करणं हे विरोधकांच कामच आहे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. तुम्ही केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहात, यावर त्यांनी कोण म्हणालं, सूत्र नाही, तुम्हीच चालवत आहात असं उत्तर दिलं.
-
एका तासाच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्ते जलमय
एका तासाच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय. अहिल्याबाई चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिक संतप्त. कल्याण-डोंबिवलीत गेल्या एका तासापासून पावसाचा जोर वाढला असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले. कल्याण-आग्रा रोड तसेच कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम. वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढत वाहने चालवावी लागत असून नागरिकांना मोठा त्रास.
-
घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर धावत्या आयशर टेम्पोला अचानक आग
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर धावत्या आयशर टेम्पोला अचानक आग लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ पुलाखालून वळवण्यात आली होती. संबंधित टेम्पोमध्ये निर्यातीसाठी नेण्यात येणारे ब्रास नट-बोल्ट भरले होते. हायड्रा मशीनच्या साहाय्याने जळालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला हटवण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
-
विलास घुले यांच्या कुटुंबीयांचे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
बीडमध्ये मृत विलास घुले यांच्या कुटुंबीयांचे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. आरोपींवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू. मयत विलास घुले यांचे कुटुंबीय पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार. येत्या दोन दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर शपथ घेणार, सुत्रांची माहिती
-
बोरीवली रेल्वे स्थानकात माकडामुळे लोकल काही वेळ मंदावली
आज सकाळी बोरीवली रेल्वे स्थानकात अचानक एक माकड ट्रॅकजवळ येऊन बसले. त्यामुळे काही वेळ लोकल सेवा मंदावली होती. आता ते माकड निघून गेलं असून लोकल सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
-
नवी मुंबईतील सायन पनवेल हायवेवर नेरुळ येथे वाहतूक कोंडी,
नवी मुंबईतील सायन पनवेल हायवेवर नेरुळ येथे वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरु आहे. पावसाचा फटका सायंन पनवेल हायवेलादेखील बसला असून वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यत रांगा लागल्या आहेत.
-
बीड – माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील खुनाचा गुन्हा केवळ 12 तासांत उघड
माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील तालखेड गावात विकास वाघमोडे नामक 33 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. जुन्या भांडणाचा आणि मारहाणीचा राग मनात धरून आरोपीने रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना विकासचा पाठलाग करून अचानक चाकुने हल्ला केला. बीड स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या 12 तासांच्या आत आरोपी आदित्य बारवाळ याला अटक केली .
-
अंबरनाथ – निलयोग नगर परिसरात झाडाच्या फांद्या कोसळल्या
अंबरनाथच्या निलयोग नगर परिसरात झाडाच्या फांद्या कोसळल्या. रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे झाडाच्या अनेक फांद्या कोसळल्या. संपूर्ण झाड सध्या धोकादायक अवस्थेत आहे. अंबरनाथ नागरपालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटल्या नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून नागरिक चिंतेत आहेत.
-
पनवेल ते सीएसएमटी लोकल मध्ये पुन्हा मध्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा
नवी मुंबई – पनवेल ते सीएसएमटी लोकल मध्ये पुन्हा मध्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, मोठ मोठ्या आवाजात शिव्या देत धमकी दिली. मी आधीच चार मर्डर केले , पुढचा नंबर तुझा अशा धमकया त्याने दिल्या. यावेळी काही प्रवासी व मध्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीमध्ये काही वेळ तणाव पाहायला मिळाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल प्रवासी आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
-
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची सततधार, मात्र शहर सोडून डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
-
नवी मुबंईतील मुंबई APMC फळ मार्केटमध्ये चोरीच्या प्रयत्नांची मालिका सुरूच
गेल्या चार दिवसांत तब्बल सहा गाळ्यांवर चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, बाजारातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघा संशयितांना रंगेहात पकडण्यात आले. संतप्त व्यापाऱ्यांनी त्यांना पकडून APMC पोलिसांच्या ताब्यात दिले आहे…सदर प्रकरणी APMC पोलीस अधिक तपास करत आहे
-
छत्रपती संभाजीनगरातील लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षकावर चाकू हल्ला प्रकरण
छत्रपती संभाजीनगरातील लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षकावर चाकू हल्ला प्रकरण; शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया देण्यास नकार. टीसीच्या वादातून माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहे. जखमी शिक्षक फ्रान्सिस दुशिंग यांच्यावर घाटी रुग्णाण्यात उपचार सुरू आहेत.
-
ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे…
नेरूळ रेल्वे स्थानक तांत्रिक बिघाड ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हर्बल लाईन रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.
-
नाशिक | संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंचायत समिती जवळ दाखल
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंचायत समिती जवळ दाखल झाली आहे. जेसीबीतून पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचे नाशिक शहरात आगमन झालं. महापौर, उपमहापौरांकडून पालखीचे स्वागत करण्यात आलं.
-
प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
-
ठाणे जिल्ह्यात जूनच्या पावसाची तूट 76% टक्के…
यंदाचा जून महिना ठाणे जिल्ह्यासाठी अक्षरशः कोरडाच ठरला ..30 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात केवळ 126.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली ..गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 76% ची घट नोंदविण्यात आली आहे. संपूर्ण जून मध्ये महिनाभर नागरिकांना उन्हाच्या झळा सहन केल्या… अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ने जोर धरला..
-
चेतन चौधरीला घेऊन पोलिस लोहगडावर
केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीला रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आले. यापूर्वी सिया गोयल ला रिक्रिएशनसाठी आणण्यात आलं होतं. पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी चेतन चौधरी याला लोहगड पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आले…
-
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
गोंदिया जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर सातत्याने कायम असल्याने सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, ग्रामीण भागातील रस्त्यांना अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आले आहे…. दुसरीकडे, या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
-
जालना जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी 2 लाचखोरांना पकडले
जालना जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी धडाकेबाज कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणात लाचखोरांना रंगेहात पकडलय. उपविभागी उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत याने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचं मस्टर मंजूर करण्यासाठी 1300 रुपयांची लाच मागितली होती तर दुसऱ्या प्रकरणात सेवानिवृत्त तक्रारदाराचे अर्जित रजेच्या फरकाचे बिल मंजूर करण्यासाठी जलसंधारण अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश खरे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदारांच्या तक्रारीवरून जालना एसीबीने सापळा रचला आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून या दोन लाचखोरांना रंगे हात पकडलं. दोघांकडूनही मोबाईल आणि अतिरिक्त असलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली.
-
जालना मंठा रोडवर भीषण अपघात
जालना मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भीषण अपघात झाला आहे.पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकी कार ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वराला चिरडलं आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर आलाय.या अपघतामध्ये तलाठी दिगांबर कुरेवाड यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान याप्रकरणी निष्काळाजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कारचालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वसई विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची रिमझिम
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती. आज सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात सकल भागात कुठेही पाणी साचलेले नसल्याने विरार वून चर्चगेट आणि चर्चगेट वून विरार जाणारी लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. मागच्या तीन दिवसापासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मात्र सुखावला असून पडणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त करीत आहे.
राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागात अलर्ट जारी केला. केतन अग्रवाल प्रकरणात दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. आरोपी पोलिस कोठडीत आहेत. सियाचा भाऊ साहिल याच्यावर पोलिसांना थेट संशय आहे. सिया आणि चेतन यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्याला कल्पना असल्याचे सांगितले जातंय. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काल सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. हा उद्धन ठाकरे यांना मोठा धक्का आहे. सचिन आहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. आजही राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jul 01,2026 8:28 AM
