Mumbai Railway : धुवांधार पावसामुळे रेल्वेला ब्रेक; कर्जत–बदलापूर लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत-बदलापूर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून, नेरळ स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

Mumbai Railway : धुवांधार पावसामुळे रेल्वेला ब्रेक; कर्जत–बदलापूर लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा
पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका
| Updated on: Jul 08, 2026 | 8:46 AM

गेल्या तीन -चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने जराही विश्रांती घेतलेली नसून बुधवारी सकाळीही राज्यात आणि मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. मात्र याचा पावसाचा फटका मुंबईकरांच्या लाईफलाइनलाही अर्थात रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा ठप्प झाली आहे. नेरळ स्थानकातील रेल्वे रुळावरती पाणी साचलं आहे. एवढंच नव्हे तर रुळांवरून दगडीही वाहून गेल्याचं समोर आलं आहे. कर्जत तालुक्यात अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे स्टेशन्सवर तसेच गाड्यांमध्येही मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पावसाचं पाणी ट्रॅकवर, खडी गेली वाहून

सततच्या पावसामुळे आज पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानका दरम्यान फाटकाजवळ, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रुळांवरही ते पाणी आल्याने, रुळाच्या खाली असलेली दगडीही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. मात्र यामुळे कर्ज-खोपोली येथून बदलापूरच्या दिशेने येणारी जी लोकलसेवा होती, ती पूर्णपणे ठप्प झाली. रेल्वे लोकल नसल्यामुळे कामावर निघालेले लोक, इतर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

नेरळ असो , वा कर्जत अथवा बदलापूर, तेथून रोज अनेक प्रवासी हे ट्रेनने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सध्या रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून स्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांच्याकडून वेगाने काम सुरू आहे. मात्र तोपर्यंत अनेक लोकल्स रद्द झाल्या असून बदलापूर ते सीएसटी या मार्गावरून जाणारी लोकल हीदेखील उशीराने धावत आहे. त्यामुळे कामावर पोहोचायचं तरी कसं असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

पुणे मुंबई रेल्वे आजही बंद

घाट परिसरातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान झालेल्या भूस्खलामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती. रेल्वे मार्गाची दुरुस्ती न झाल्यामुळे मंगळवारी 14 रेल्वे गाड्या रद्द झाल्या आणि 13 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले रेल्वे सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले.  दरम्यान आज बुधवारीदेखील पुणे – मुंबई रेल्वे बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

Follow Us