Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात पावसामुळे मोठं संकट, 5 हजार नागरिकांना हलवलं, लष्काराला बोलावलं
Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात पावसाने आपलं रौदरुप दाखवलं आहे. त्यामुळे पाच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं आहे. लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तिथे आता ताजी स्थिती काय जाणून घ्या.

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत तर सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे. या स्थितीत महाराष्ट्राच्या एका जिल्हयात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नांदेड जिल्ह्यात भयानक पाऊस कोसळला आहे. त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कंधार व माळाकोळी मंडळात सर्वाधिक 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, CRPF, नांदेड महानगरपालिका व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे.
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालियनला बोलवण्यात आले. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, आसना नद्यांना पूर आला आहे.
1 लाख 20 क्युसेसने विसर्ग सुरू
जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. नांदेडच्या उमरी रेल्वे स्टेशन अधीक्षक यांचा मृत्यू झाला. विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले आहेत. 1 लाख 20 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. उमरी तालुक्यातील बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे सर्व 16 दरवाजे उघडले आहे. लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले आहेत. लाखो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. जिल्हाभरात अनेक जनावर दगावल्याची भीती आहे.
मुख्यमंत्र्यांनी नांदेडबद्दल काय माहिती दिली?
नांदेड येथे मुसळधार पाऊस सुरु आहे, 500 नागरिक अडकले आहेत, सरकारची तयारी काय? यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. “नांदेडमध्ये “खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. जी काही वरच्या भागातली धरणं आहेत, त्यातून अधिक वेगाने पाणी सोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, बाजूच्या राज्यांशी चर्चा केलेली आहे. लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. पाण्याचा वेग पाहता लष्काराला पाचारण केलेलं आहे. परिस्थिती प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे. जिवीतहानी होऊ नये, यासाठी जे जे करणं गरजेच आहे, ते ते केलं जात आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
