बारामतीमध्ये अस्मानी संकट, कालवा फुटला, शेतीत अन् घरांमध्ये प्रचंड पाणी, अजित पवारांकडून पहाटेच पाहणी
बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे बारामतीमधील निरा डावा कळवा फुटला आहे. कालव्याचे पाणी शेतीत आणि लोकांच्या घरांमध्ये गेले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महामार्गावर पाणी साचले आहे. पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच पाहणी दौरा केला.

महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री मे महिन्यातच झाली आहे. त्याचवेळी राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमशान घातला आहे. पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. बारामतीत प्रचंड पाऊस झाला आहे. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बारामतीचा नीरा डावा कालवा फुटला आहे. शेतांमध्ये आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी गेले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महामार्गावर पाणी साचले आहे. पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच पाहणी दौरा केला.
महामार्गावर तळ्यासारखी परिस्थिती
बारामतीत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या प्रचंड पावसामुळे बारामतीमधील निरा डावा कलवा फुटला आहे. पिंपळे लिमटेक या ठिकाणी कालवा फुटला आहे. त्यानंतर पंढरपूर महामार्गावर सकाळीसुद्धा तळ्यासारखी परिस्थिती आहे. कालवा फुटल्याने शेतीच मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती खचल्या आहेत. या खचलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द
बारामतीमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले. सोमवारी सकाळीच ते शेतीच्या बांधावर पोहचले. शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर अजित पवार शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीच्या कंबळेश्वर गावात पाणी शिरले आहे. जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून दिली जात आहे.
बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडले. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
