‘मी तुमचं संरक्षण करू शकलो नाही…,’विशाळगडाला भेट दिल्यानंतर काय म्हणाले शाहु महाराज
विशाळगडावरील तोडफोडीला जबाबदार असणाऱ्या काही स्थानिकांची नावे इथल्या महिलांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना सांगितली आहेत. त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

कोल्हापूरातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणाविरोधात राजकारण तापले आहे. या अतिक्रमणा विरोधात संभाजी महाराज छत्रपती यांनी भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर तेथे स्थानिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यास प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गटात हाणामारी झाल्याने येथे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेत्यांसोबत विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर परिसराला आज भेट दिली.
14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याला काही समाजकंटकांनी काही विशिष्ट समाजाच्या घरांना लक्ष करत घरांची मोडतोड केली होती. तसेच वाहनं जाळून मोठं नुकसान केलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या नागरिकांना भेटण्यासाठी गजापूर येथे गेले होते. शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी या परिसरात झालेल्या तोडफोडीची पाहणी करत इथल्या नागरिकांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्यांना भावनिक आधार देत त्यांच्यासोबत चर्चा केली. स्थानिक नागरिकांनी 14 तारखेला झालेला संपूर्ण घटनाक्रम यावेळी सांगितला.यावेळी महिलांना आपले अश्रू अनावर झाले. जमावाने अनेक घरांना लक्ष करत वाहनांची तोडफोड करत प्रार्थना स्थळाची देखील मोडतोड केल्याचे स्थानिक नागरिकांनी यावेळी या नेत्यांना सांगितले.
घटनेची माहीती असतानाही पोलीसांचे दुलर्क्ष – सतेज पाटील
गजापूर येथे झालेल्या या हल्ल्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती असताना देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. तसेच गजापूर मधल्या नागरिकांसोबत आपण संपूर्ण ताकतीनिशी उभे राहणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
मी तुमचं संरक्षण करू शकलो नाही – शाहू महाराज
गजापूर इथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. तसेच छत्रपती म्हणून मी तुमचं संरक्षण करू शकलो नाही याची आपणाला खंत वाटत असल्याचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी आणि गजापूर येथील नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही खासदार शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
