पहाटे 4 ला उठला, गॅलरीत गेला अन्…; कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचे नागपुरात टोकाचे पाऊल, मन सुन्न करणारं कारण समोर
आयआयआयटी (IIIT) नागपूरच्या कॅम्पसमध्ये कोल्हापूरच्या २० वर्षीय श्रेयस माने या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. परीक्षेचा ताण की प्रशासकीय त्रुटी? या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये संताप असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) नागपूरच्या कॅम्पसमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या श्रेयस चंद्रकांत माने या 20 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहाच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरले आहे. यामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
श्रेयश माने हा IIIT नागपूरमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. श्रेयस हा अभ्यासात हुशार होता. त्याच्या सत्र परीक्षा (Semester Exams) अगदी तोंडावर आल्या होत्या. मात्र अचानक सोमवारी ४ मे रोजी पहाटे ४ च्या सुमारास संपूर्ण कॅम्पस शांत असताना, त्याने वसतिगृहाच्या गॅलरीतून खाली उडी मारली. अचानक मोठा आवाज झाल्याने सुरक्षारक्षक आणि इतर विद्यार्थी धावत तिथे पोहोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी श्रेयस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रेयस गेल्या काही दिवसांपासून सिलेबस पूर्ण न झाल्यामुळे चिंतेत होता. आधीच इंजिनिअरिंगसाठी कठीण विषय असतात. एकीकडे या विषयांचा दबाव आणि दुसरीकडे आगामी परीक्षांमध्ये यश मिळेल की नाही, यामुळे तो सतत चिंता करायचा, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
श्रेयस शांत होता, पण त्याच्या वागण्यातून तो काहीतरी दबावाखाली असल्याचे जाणवत होते, असे त्याच्या एका वर्गमित्राने सांगितले. मात्र ही आत्महत्या केवळ शैक्षणिक तणावातून होती की त्यामागे इतर काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणे होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
विद्यार्थ्यांचा रोष
या घटनेची बातमी कॅम्पसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध ठिय्या आंदोलन सुरु केले. एवढ्या मोठ्या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ व्यावसायिक समुपदेशक (Counselor) उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे आणि त्यांच्यावर असलेल्या दबावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा रोष व्यक्त केला. वसतिगृहातील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या संवाद प्रणालीत त्रुटी असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.
याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तो कोणाशी शेवटचे बोलला होता, त्याने काही सुसाईड नोट डिजिटल स्वरूपात ठेवली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. कोल्हापुरात त्याच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या जबाबावरून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
