Weather Update : प्रतितास 100 किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

पुढील 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. देशातील अनेक भागांमध्ये प्रति तास 100 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही मोठा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : प्रतितास 100 किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 4:30 PM

देशासह राज्यात सध्या तापमानानं उच्चांक गाठला आहे. अनेक भागांना तापमानाचा मोठा फटका बसत आहे. मात्र त्याचदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर काही भागांमध्ये प्रचंड वादळीवारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्यानं मोठं नुकसान देखील झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्माळून पडली आहेत, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. दरम्यान आता देशात मान्सूनची एन्ट्री कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भारतीय हवामान विभाग (IMD) कडून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा उलटफेर पहायला मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये प्रतितास 100 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान मान्सूनबाबत देखील आयएमडीकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. मान्सून भारताच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे, अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळू शकतं. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगढमध्ये प्रति तास 100 कीमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, गारपीट देखील होऊ शकते. हरियासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Follow Us