मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; शाखा प्रमुखांना काय दिले आदेश?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनात शिवसेना ठाकरे गटाचे सर्व विभाग प्रमुख आणि मुंबईतील जवळपास 227 शाखाप्रमुखांची बैठक पार पडली.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीकडे. यावेळी मुंबई महापालिकेची सत्ता कोण काबीज करणार? महायुती की महाविकास आघाडी? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाणार की? युती आघाडीमध्ये? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात शिवसेना ठाकरे गटाचे सर्व विभाग प्रमुख आणि मुंबईतील जवळपास 227 शाखाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुंबई महापालिकेत तीन वर्षांमध्ये आपण जे करून दाखवलं, ते आताच्या सरकारने घालवून दाखवलं हे लोकांना सांगा, त्यासोबतच मुंबई महापालिकेची निवडणूक जवळपास सात वर्षांनी होत आहे. त्यामुळे सर्वांनी जोमानं कामाला लागा, आपल्याला मुंबई महापालिकेवरती भगवा फडकवायचा आहे. विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक आणि शाखा प्रमुख यांनी प्रत्येकांनी शाखेला भेट देऊन तिथे कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे. मतदार याद्या देखील व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत जी चूक झाली ती आता पुन्हा होता कामा नये, त्याकरता सर्वांनी व्यवस्थित काम करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी शाखा प्रमुखांना दिले आहेत.
त्यासोबतच मुंबईतील जे काही मूलभूत प्रश्न आहेत, स्वच्छता, आरोग्य, पाणी यसारख्या प्रश्नांकडे देखील लक्ष द्या. तसेच कशापद्धतीनं सरकारकडून आपली गळचेपी सुरू आहे, हे लोकांच्या लक्षात आणून द्या. ‘पालिकेवर पुन्हा भगवा एकहाती फडकवण्यासाठी जोमाने काम करा, आपण जे करुन दाखवलं ते सरकारनं घालवून दाखवलं, हे लोकांना सांगा. मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा, असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
