IND vs PAK : भारत -पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण होणार की नाही? त्या पत्रामुळे सस्पेन्स वाढला

आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. मात्र या सामन्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

IND vs PAK : भारत -पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण होणार की नाही? त्या पत्रामुळे सस्पेन्स वाढला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2025 | 7:07 PM
आशिया कपमध्ये आज हाय होल्टेज सामना रंगणार आहे, भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने असणार आहेत. मात्र या सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे, पहलगाम हल्ल्याच्या दोनच महिन्यांनंतर पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना संचार सेनेचे अध्यक्ष अखिल अनिल चित्रे यांनी सोनी पिक्चर्सला पत्र लिहून हा सामना न दाखवण्याची मागणी केली असून, “असंवेदनशील आणि बेजबाबदार प्रमोशन” केल्याबद्दल सार्वजनिक माफी मागण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
    पत्रात नेमकं काय म्हटलं? 
‘पाकिस्तान प्रायोजित दहशतीत निरपराध भारतीय मारले जात असताना, अशा सामन्याचा तमाशा म्हणून प्रचार करणे केवळ असंवेदनशीलच नाही तर दुःखी राष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. “सवाल उठ रहे हैं – मैच होना चाहिए की नाही… जवाब भी वायरल होगा… Witness history” असा प्रचार अत्यंत चुकीचा असून भारतीय जनतेच्या भावना दुखावणारा आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, फक्त काही तासांच्या TRP साठी अशा प्रकारे प्रसारण केल्यास भारतीय प्रेक्षकांचा विश्वासघात होईल आणि सोनी पिक्चर्सची प्रतिमा कलंकित होईल.
1.भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे प्रसारण आणि प्रचार तातडीने मागे घ्यावा.
2.राष्ट्रभावना आणि मानवहानीपेक्षा TRP ला महत्त्व देणाऱ्या या अशोभनीय मोहिमेबद्दल सार्वजनिक माफी मागावी. आज घेतलेला निर्णय उद्या तुमची प्रतिमा ठरवेल. TRP च्या मागे लागून ही रेषा ओलांडल्यास ते धाडस नव्हे, तर लाजिरवाणे कृत्य म्हणून लक्षात ठेवले जाईल, त्यामुळे  राष्ट्रहिताला धक्का पोहोचवणारे प्रसारण तातडीने थांबवावे’ असं या पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन 
दरम्यान शिवसेना  ठाकरे गटानं या सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, आज राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.