मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

IMD warning : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. मोठे संकट राज्यावर आहे. उष्णता वाढताना दिसत आहे. सूर्य आग ओकत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला.

मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर
heat alert
| Updated on: Apr 16, 2026 | 7:12 AM

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता अधिक वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले. यासोबतच राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागात अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, धुळे, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वाशिम, जळगाव, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पारा 42 अंशच्या पार गेला. आजही हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. काही भागात पाऊस होण्याचाही अंदाज आहे. पावसाचे संकट एप्रिल महिन्यातही टळताना दिसत नाही. नागरिकांनी उष्णतेचा अलर्ट असताना दुपारी 12 ते 4 दरम्यान घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळावे.

धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 42 अंशावर पोहोचल्याने कमालीची उष्णता वाढली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, गॉगल यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्यांनी त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षात उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांकडून करण्यात आले.

वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्याचे तापमान 43.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले. जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना गुरुवारी 16 एप्रिल रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली. गुरुवारी शाळांना सुटी देण्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आदेश दिले. उन्हाची तीव्रता वाढली असून तापमान 43 ते 45 अंशपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असून अनेक भागात तापमान वाढत आहे. अहिल्यानगरमध्येही गेल्या काही दिवसांत तापमान वाढले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी तहान नसली तरी वारंवार पाणी प्यावे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी यांचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. हलके, सुती कपडे घालावेत आणि डोके झाकूनच बाहेर पडावे. डोकेदुखी, चक्कर, जास्त घाम, अशक्तपणा ही उष्माघाताची लक्षणे असून अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच लहान मुले, वृद्ध आणि प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us