Heavy Rain Alert : 28, 29, 30 आणि 31 डिसेंबरला मुसळधार पाऊस, अलर्ट जारी, थंडीच्या लाटेसह…

Maharashtra Weather Update : राज्यासह देशात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. हेच नाही तर काही शहरांमधील हवा अत्यंत दूषित झाली असून आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत.

Heavy Rain Alert : 28, 29, 30 आणि 31 डिसेंबरला मुसळधार पाऊस, अलर्ट जारी, थंडीच्या लाटेसह...
Rain
| Updated on: Dec 28, 2025 | 8:28 AM

राज्यात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी थंडी गायब झाली होती. आता पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत असून पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट असण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण डिसेंबर महिना राज्यात थंडीचा कडाका बघायला मिळाला. राज्यात जरी सध्या थंडीची लाट असली तरीही देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मॉन्सून जाऊन काही महिने उलटली असतानाही देशातून पाऊस जाण्याचे नाव घेत नाहीये. सतत पाऊस सुरू आहे. मुंबई, दिल्ली आणि पुण्यात प्रचंड वायू प्रदूषण वाढले असून हवा आरोग्यासाठी अत्यंत घातक बनली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. ज्या लोकांना श्वसनासंबंधित त्रास आहेत, अशांनी घराबाहेर पडणे टाळावे किंवा मास्क सतत वापरावा असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

धुळे येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली असून धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आहिल्यानगर 7.3 सेल्सिअस, परभणी 7.5 सेल्सिअस, निफाड 7.4 अंश सेल्सिअस, नागपूर, गोंदिया, भंडारा, नाशिक येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाजा भारतीय हवामान विभागाचा आहे.

भारतीय हवामान विभागाने 28 ते 31 डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसासह थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा असून तिथे अजूनही पाऊसच सुरू आहे. 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर रोजी केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडेल.

मुंबईत सध्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200 च्या वर गेला आहे, परिणामी सर्दी-खोकला आणि श्वसनाचे विकार वाढले आहेत. यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे त्रास, घसा दुखणे, सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी जाणवत आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषण वाढले आहे, तर बांधकाम प्रकल्पांमुळे उडणारी धूळ हे एक मोठे कारण आहे. कमी वेगाचे वारे प्रदूषकांना शहरात रोखून ठेवत अयल्यानेही वायू प्रदुषण मुंबईसाठी जटील समस्या बनत चाललीये.