Indurikar Maharaj : हातात फलक अन् इंदुरीकर महाराजांसमोरच विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी… अहिल्यानगरमध्ये काय घडलं? आता महाराज कायमचा मोठा निर्णय घेणार?
प्रसिद्ध प्रवचनकार इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा सध्या चर्चेत आहे. साधेपणाचा सल्ला देणाऱ्या महाराजांच्या घरच्या या थाटामाटावरून त्यांना ट्रोल केले जात आहे. या टीकेला वैतागून त्यांनी कीर्तन थांबवण्याचा (फेटा खाली ठेवण्याचा) इशारा दिला होता, पण आता त्यांना अनेक मान्यवरांकडून आणि विद्यार्थ्यांकडून पाठिंबा मिळत आहे. महाराजांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

लाडक्या लेकीच्या साखरपुड्याचा थाट, राजेशाही एंट्री, बक्कळ पैसा खर्च केल्यामुळे प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आपल्या कीर्तनातून लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या , ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडाल काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाल्याचे दिसून आलं. त्याचे बरेच फोटो, व्हिडीओ समोर आले,त्यामध्ये सोहळ्याचा भपका, राजेशाही थाट अगदी स्पष्ट दिसत होता. झगमग कपडे, मोठ्या गाड्यांचा ताफा, आकर्षक रोषणाई, भव्य हॉल, खाण्या-पिण्याची रेलचेल अशी जय्यत तयारी असलेल्या हॉलमध्ये ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा झाला. कर्ज काढून साखरपुडा करू नका, साध्या पद्धतीनेही लग्न करता येतं असा सल्ला इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून लोकांना देत असतात.
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अशी म्हण आहे ना. इतरांना साधेपणाचा सल्ला देणारे प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज यांनी आपल्याच वाणीवर कायम न राहता, मुलीच्या साखरपुड्यात केलेला थाट, खर्च पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावर समोर आलेले फोटो, भावी वधू-वरांची भव्य एंट्री पाहून अनेकजण हबकलेच आणि त्यांनी त्या सर्वांवर कमेंट्स करत मत मांडायला सुरूवात केली. प्रवचनातून साधेपणाचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या घरचा सोहळा एवढा भव्य कसा असा प्रश्न विचारत अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास, त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. पाहता पाहता हे प्रमाण बरचं वाढलं आणि गेल्या अनेक दिवसांपासून इंदुरीकर महाराज हे टीकेच्या अग्रस्थानी आले.
टीका, ट्रोलिंगनंतर दिले होते मोठे संकेत, काय निर्णय घेणार ?
मात्र चहूकडून होणारी ही टीका, प्रत्येक गोष्टीवर ठेवलेलं हे बोटं, मुलीच्या कपड्यांवर, थाटमाटावर, खर्चावर विचारलेले हे प्रश्न यामुळे इंदुरीकर महाराज एकंदरीतच वैतागले असून त्यांच्या नुकत्याच काही कीर्तनातून त्यांनी हा राग व्यक्त केला. आम्ही किती कष्ट केले, कसे दिवस काढले हे सांगत माझ्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट करणारे लोक कसे बोलतात, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सवरच टीका केली आहे. एवढंच नव्हे तर होणाऱ्या टीकेला वैतागून त्यांनी त्यांचा फेटा खाली ठेवण्याचे, म्हणजेच कीर्तन थांबवण्याचेही संकेत देत इशारा दिला.
रुपाली ठोंबरेंनी दिला पाठिंबा, फेटा खाली न ठेवण्याची विनंती
मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर अनेक लोक हे इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी उभे राहताना दिसत असून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर भलीमोठ्ठी पोस्ट लिहीत इंदुरीकर महाराजांना फेटा खाली न ठेवण्याती विनंती केली. विकृत छपरी लोकांकडे लक्ष देऊ नका, अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी लेक म्हणून विनंती आहे, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं होतं. त्याची पोस्टही सगळीकडे व्हायरल झाली होती.
“आजच्या तरुण पिढीला तुमची गरज आहे”, शालेय विद्यार्थ्यांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
तर आता काही शालेय विद्यार्थीदेखील इंदुरीकर महाराज यांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील केली आहे. प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठं चर्चेत आहे. ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर निवृत्ती महाराजांनी “आता बास, आता थांबणार… यापुढे कीर्तन करणार नाही” असं विधान केलं होतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं त्यांच्या अनुयायांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी शालेय विद्यार्थ्यांनी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.”निवृत्ती महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत”, “आजच्या तरुण पिढीला तुमची गरज आहे” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी महाराजांप्रती आपला भावनिक पाठींबा व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या घोषणा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून आता इंदुरीकर महाराज काय मोठा निर्णय घेतात,आधी म्हटल्याप्रमाणे ते खरंच फेटा खाली ठेवणार का?, कीर्तन थांबवणार का, की त्यांचा निर्णय मागे घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
