जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
जळगावात ममुराबाद रोडवर भरधाव ट्रकने कावड यात्रेतील सहभागी आठ वर्षीय चिमुकल्याला चिरडले...

Jalgaon Kawad Yatra Accident : जळगावात ममुराबाद रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका भरधाव ट्रक थेट कावड यात्रेत घुसला. या अपघातात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच घटनेनंतर घटनास्थळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्या भागाताली लोकांनी अपघातानंतर ट्रक उभा पेटवून दिला आहे. ट्रक पेटवल्याचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.
नेमकं काय घडलं?
जळगावात ममुराबाद रोडवर भरधाव ट्रकने कावड यात्रेतील सहभागी आठ वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर संतप्त जमावाने जागेवरच ट्रक पेटवून दिला. सोबतच चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर जमावाने रस्त्यावरच रास्ता रोको केले. आंदोलकांनी रस्त्यावरच चिमुकल्याचा मृतदेह ठेवला.
तरुणाला दिला चोप
घटना घडल्यानंतर जमलेल्या लोकांनी रास्ता रोको केला. तसेच ट्रकचालकाला आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा काही लोक मोबाईलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग करणाऱ्यांनाही जमावाने चोप दिला आहे. या घटनेमुळे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली. दोघी बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. तर दुसरीकडे ही घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला. जमावला पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक जमावाने रास्तारोको सुरूच ठेवला.
बालकाला चिरडणारा ट्रक पूर्ण खाक व्हावा म्हणून संतप्त जमावाने ट्रक विझवण्यासाठी अग्निशमन बंबदेखील जावू दिला नाही, त्यामुळे अग्निशमन बंबाला परत जावं लागलं. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता रस्ता रोको आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. ट्रक चालकाने तब्बल पन्नास मीटर पर्यंत बालकाला चिरडल्यावर फरफटत नेल्याने जमाव संतप्त झाला होता.
अपघात नेमके का होतात?
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अपघात नेमके का होतात? असे विचारले जात आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने बहुसंख्य अपघात होतात. वाहन चालकांनी हे नियम चालवावेत. वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्यांनी रस्त्याच्या कडेनेच चालावे. लहान वाहनांतून प्रवास करणाऱ्यांनीही वाहने सावकाश चालवावीत असे सांगितले जात आहे. पोलीस जळगावात घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत. ट्रकला लावण्यात आलेली आग विझविण्यात आलेली आहे.
