खून का बदला खूनसे… बुलेट आडवी लावली, कपाळाच्या मधोमध गोळी घातली; जळगावात नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ४० वर्षीय गोपाळ मालचे यांची सिनेस्टाईल पाठलाग करून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी राहुल कोळीने २०१० मध्ये झालेल्या त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील एका ४० वर्षीय तरुणाची सिनेस्टाईल पाठलाग करुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोपाळ सोमा मालचे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. राहुल कोळी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावातील धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ मंगळवारी रात्री सिनेस्टाईल पाठलाग करून एका ४० वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी राहुल ज्ञानेश्वर कोळी हा आरोपी स्वत:हून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर त्याने पोलिसांना घटनेची सर्व माहिती दिली.
गोपाळ मालचे हे त्यांच्या वाहनाने जात असताना वाकटुकी फाट्याजवळ राहुल कोळी याने त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी डोक्यात गोळी लागल्याने गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल कोळीने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून चार राऊंड फायर केले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ मालचे याने २०१० मध्ये राहुल कोळीचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांचा खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राहुल कोळीने गोपाळ मालचे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी…
गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची आग धगधगत होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास गोपाळ मालचे कुटुंबियांसोबत घरी परत येत होते. त्यावेळी राहुलने विहीर फाटा येथे त्यांच्या कारसमोर आपली बुलेट लावली. रस्त्यात उभी असलेली बुलेट गोपाळ मालचे गाडीतून खाली उतरले. त्यावेळी राहुलने गोपाळच्या कपाळाच्या मधोमध नेम धरून गोळी झाडली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपी राहुल कोळी याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
