
महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न सातत्याने समोर येत असतात. जळगावात आज अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाली. पीडित अल्पवयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले. यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे परिस्थितीत हाताळण्याचा प्रयत्न केला.
जळगावच्या नशिराबाद येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जमावाने पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. दोन गट समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त परिसरात तैनात केला. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
संबंधित घटनेनंतर पोलीस ठाण्यासमोर मोठा गोंधळ उडाला. दोन गट आमने-सामने येवून जमाव जमल्याने गोंधळ झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. यावेळी दोन गटात दगडफेक झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून दगडफेक झाली नसल्याचं स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. दगडफेकबाबत फक्त अफवा पसरल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची छेड तसेच विनयभंग करणाऱ्या तरुणासह आणखी दोन तरुणांना अटक केली आहे. संबंधित परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्यासमोर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे