Eknath Khadse : नाथाभाऊ, तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत? ये रिश्ता क्या कहलाता हैं? गिरीश महाजनांनी अखेर ठेवणीतलं अस्त्र काढलंच

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे एकमेकांना चिमटे काढण्याला काही खंड दिसेना. खानदेशातील दोन्ही नेते एकमेकांच्या उखळ्या-पाखळ्या काढत असल्याचे दिसत आहे.

Eknath Khadse : नाथाभाऊ, तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत? ये रिश्ता क्या कहलाता हैं? गिरीश महाजनांनी अखेर ठेवणीतलं अस्त्र काढलंच
पुन्हा रंगला कलगीतुरा
| Updated on: Jul 24, 2025 | 11:34 AM

एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात विस्तवही जात नसल्याचे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. एकमेकांना चिमटे काढण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. काल ही दोन्ही नेत्यांमधील विळा-भोपळ्याचे सख्य दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील वितुष्ट वाढले आहे. आता गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंवर खास ठेवणीतील बाण सोडला आहे. त्यामुळे खानदेशात खळबळ उडाली आहे.

या गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या?

मंत्री गिरीश महाजन यांनी अगदी ठेवणीतील अस्त्र बाहेर काढले. हनी ट्रॅपवरून खडसेंनी महाजन यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यावर महाजनांनी नाथभाऊंवर तेच अस्त्र चालवले. त्यांच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. फेसबुकवर गिरीश महाजन यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात दोन फोटो पोस्ट केले आहेत. गुलाब घेतलेली एक व्यक्ती आणि कारमध्ये नाथाभाऊ अशा या फोटोवर महाजन यांनी गुलाबी अस्त्र ओढले आहेत. माफक शब्दात मोठा आशय पोहचवण्याचे कसब महाजनांनी दाखवले आहे.

एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे, असा टोला महाजनांनी लगावला आहे. खडसे आणि लोढा यांचा फोटो शेअर करत त्यांनी या पोस्टवरून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न

२०१९ ते २०२२ च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच, अशी मनातील ती सल मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!

आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय ? “एकनाथ खडसे, काय ही तुझी व्यथा?” म्हणत महाजनांनी खडसेंना डिवचले. एकनाथ खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोढांचा फोटो व्हायरल झाला. मंत्री गिरीश महाजनांकडून फोटो पोस्ट करत खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? असा खोचक सवाल त्यांनी केला. ये रिश्ता क्या कहलाता हैं?, म्हणत महाजनांचा खडसेंना टोला लगावला. माझ्यावर असंख्य आरोप केले, पण मी निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झाले, असे महाजन म्हणाले.