उद्धव ठाकरेंकडे माझ्याविरोधात उमेदवारच नाही…; शिंदेच्या गटाच्या मंत्र्यांचं विधान चर्चेत
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात घडामोडी घडत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्याबाबत शिंदे गटाच्या मंत्र्याने एक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे माझ्या विरोधात उमेदवार देऊच शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र डागलं आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात माझ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडे कुठलाही उमेदवार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं की ही जागा ते लढणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघात माझ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाला आयात उमेदवार द्यावा लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. जसे 40 आमदार तुम्ही डब्यात घातले. तसे जळगाव जिल्ह्यात संघटना सुद्धा तुम्ही डब्यात घालणार का?, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटाला रोखठोक शब्दात आव्हान दिलं आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
सर्वात जास्त वेळा आमदार देणारा जळगाव ग्रामीण मतदारसंघात असताना ही जागा घेण्यात उदासीनता का? शिवसेना ठाकरे गटाने जाहीर करावा ही जागा आम्ही लढणार आहे. पण ते लढू शकत नाही. काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मात्र आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच काम करत आहोत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. जळगाव लोकसभेत सुद्धा भाजपमधले करण दादा ठाकरे गटात गेल्यामुळे त्यांना उमेदवार मिळाला आणि ते निवडणूक लढू शकले. त्याचप्रमाणे आता विधानसभेत सुद्धा जळगाव ग्रामीण मतदार संघात उमेदवार आयात करणार का?, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.
गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाचं प्रत्युत्तर
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला जळगाव शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाकडे उमेदवार सापडला का नाही हे दुर्बीण घेऊन गुलाबराव पाटील फिरत आहेत का? त्यांना सांगा तुमचं बघा आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. त्यांनी स्वतःची प्रतिमा काय आहे, त्यावर लक्ष द्यावं. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्याच्याकडे निष्ठा आहे तो माणूस आम्हाला शिकवू शकतो गद्दार आणि कलंकित माणूस आम्हाला शिकवू शकत नाही. आम्हाला उमेदवार आयात करायचा मी निर्यात करायचा आमचा आम्ही काय ते बघून घेऊ, असं संजय सावंत म्हणालेत.
आमच्या संसारात त्यांनी लक्ष घालू नये. त्यांनी जी कुठली रस्त्यावर फिरणारी घेऊन फिरतायेत ना. त्याच्या बद्दल विचार करावा. यांनी एका भाषणात स्वतःला बाजीप्रभू म्हणाले. बाजीप्रभू सातच्या नंतर तयार नाही व्हायचे… आता गेलास ना तिकडे तर तिकडे सुखी रहा आमचा आम्ही काय करायचं ते बघून घेऊ, असं म्हणत संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.