अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो! पवारांचीच परवानगी, राष्ट्रवादी एकत्र येण्याची नांदी?
Sharad Pawar -Ajit Pawar-NCP: गेल्या आठवडाभरपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा दावाही करण्यात येत होत्या. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकणार असल्याचे वृत्त धडकल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही ९मराठी : गेल्या आठवड्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप प्रणीत NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघाले. जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी भेट झाली. या औपचारिक भेटीत काय शिजले हे समोर आले नाही. पावसाळी अधिवेशनात विधीमंडळातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली. पण हा योगायोग असल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले. तर आता जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार (Sanjay Pawar Meet Sharad Pawar NCP) यांचा फोटो झळकणार आहे. राष्ट्रवादी अजित गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणाची, एकत्रिकरणाची ही नांदी आहे का? याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो!
बॅनर, पोस्टरवर रितसर फोटो वापरण्यासंदर्भात परवानगी द्यावी म्हणून राष्ट्रवादी अजित गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली. फोटो वापरण्यास शरद पवार साहेबांनी मान्यता दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. या परवानगी संदर्भातील एक पत्र ही त्यांनी माध्यमांना दाखवले. त्यांच्या या दाव्याने केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
त्या पत्रात काय?
राष्ट्रवादी अजित गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले आणि ते स्वतः त्यांना दिले. त्या पत्रात राष्ट्रवादी फुटीचा उल्लेख त्यांनी केला आहे. अजितदादा महायुती सोबत गेले असले तरी शरद पवार यांचा फोटो ते कायम वापरत. पण शरद पवार यांनी फोटो न लावण्याचे आदेश दिल्यानंतर हा फोटो वापर बंद झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजही त्यांच्या भाषणाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अशी करतात. तर एकनाथ शिंदे सुद्धा बाळासाहेबांना वंदनीय मानतात, याचा उल्लेख करत माझे वडील मुरलीधर अण्णा पवार हे आपले सहकारी मित्र होते. मित्राच्या मुलाच्या नात्याने मला तुमचा फोटो लावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती संजय पावर यांनी केली.
फोटो वापरण्यासाठी पवारांची स्वाक्षरी
फोटो वापरण्यासंदर्भात परवानगी मिळावी यासंदर्भात दिलेल्या पत्रावर स्वत:च्या हस्ताक्षरात शरद पवार यांनी मान्यता असे लिहून त्याखाली स्वाक्षरी केली आहे. पुढच्या काळात मी माझ्या प्रत्येक बॅनरवर अजित दादा सोबत शरद पवार यांचा फोटो वापरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले. संजय पवार यांना मान्यता मिळाली म्हणजे ती सर्व कार्यकर्त्यांना मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या इतर जिल्हाध्यक्ष, आमदार आणि खासदारांनाही अशीच परवानगी शरद पवार हे देणार का, याची विचारणा सुरू झाली आहे. फोटो वापरण्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील मी पत्र लिहिणार असल्याचा संजय पवार यांनी बोलताना सांगितले.