Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती अजून खालावली, रात्री अडीच वाजता कुणाचा फोन आला? खडबडून जाग आलेल्या सरकारने काय शब्द दिला?
Manoj Jarange Patil Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली. त्यांनी यापूर्वी उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मध्यरात्री त्यांची तब्येत खालावली, त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले, काय शब्द दिला?

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेने मराठा आंदोलक काळजीत पडले होते. दरम्यान काल रात्री मध्यरात्री जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि त्यांनी एक मोठा शब्द दिला.
मध्यरात्री जरांगे यांची तब्येत खालावली
मध्यरात्री मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि बीपी देखील कमी झाला. रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ही मिळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर सलाईन घेतले. सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याची भूमिका त्यांनी पुन्हा जाहीर केले. प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखत टायर जाळले तर आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर तिसऱ्यांदा मराठा आंदोलकांनी केला रस्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे मात्र सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप करत राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाज बांधव आक्रमक होत आहे, धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शहागड परिसरातल्या पैठण फाटा या ठिकाणी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको केलाय शिवाय टायरही जाळून सरकारचा निषेध व्यक्त केलाय, मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी नेहमी वर्दळ असलेला हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलाय, पोलिसांनी या आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळ हे आंदोलक रस्त्यावरच ठिया देऊन बसले होते.
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला नांदेडच्या दोन आमदारांचा पाठिंबा
शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दोन्ही आमदारांना नांदेड येथील मोर्चात सहभागी झाल्या नंतर मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता.