Manoj Jarange: पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील मैदानात… मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच? तो थेट इशारा

Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केला. गोड बोलून फडणवीस सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

Manoj Jarange: पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील मैदानात... मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच? तो थेट इशारा
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 16, 2026 | 10:16 AM

Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नसल्याचे जरांगे म्हणाले. ज्या दिवशी तारीख निश्चित केली, त्यादिवशी आंदोलन होणार असल्याचे ते म्हणाले. 8 महिने उलटून गेले तरीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. समाजाच्या कल्याणासाठी आता आंदोलनाचा पर्याय असल्याचे ते म्हणाले. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. सकाळी १० वाजता ही बैठक होईल. त्यानंतर ते समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, अशा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत “आपण जिकलो” अशी घोषणा देत जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते.

आंदोलनाची पुन्हा हाक

मात्र, त्यानंतर हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला प्रत्यक्षात ठोस फायदा झालेला नसल्याची भावना समाजात निर्माण झाली. कारण या गॅझेटनुसार 308 नोंदी सापडल्या आहेत. दुसरीकडे शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे कामही जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती असल्याने मराठा समाजात पुन्हा नाराजी वाढताना दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.

या भेटीचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध आहे का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी अलीकडेच टीका करत नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे आजच्या बैठकीत ते मुख्यमंत्री किंवा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतात का?, याकडेही मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाची दिल्लीकडे कूच?

मराठा समाजाने राज्यात सगळीकडे मोर्चे काढले. प्रत्येक मोठ्या शहरात, तालुक्याच्या ठिकाणी आणि बाजार गावात मराठा समाजाने आंदोलन केले. वाशी आणि त्यानंतर मुंबईत मराठ्यांचा मोर्चा धडकला. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठे यश आले. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट आणि इतरप्रमाणे कुणबी उल्लेख ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्याचे निश्चित झाले. पण त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना मराठा समाज दिल्लीकडे कूच करण्याचे संकेत दिले आहेत. 11 वाजेच्या पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us