नाथसागराची शंभरीकडे वाटचाल, कोरड्याठाक मराठवाड्यात उमेदीची ‘लाट’

हे धरण (Jayakwadi dam) एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं. याही दशकात हे धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे.

  • Updated On - 8:55 pm, Mon, 12 August 19 Edited By:
नाथसागराची शंभरीकडे वाटचाल, कोरड्याठाक मराठवाड्यात उमेदीची 'लाट'

औरंगाबाद : आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी (Jayakwadi dam) म्हणजेच ‘नाथसागर’ यावर्षी तब्बल 88.33 (सोमवारी सायं. 7 वा. पर्यंत) टक्के भरलंय आणि शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. हे धरण (Jayakwadi dam) एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं. याही दशकात हे धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे. मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. कारण, या धरणाचं लाभक्षेत्र संपूर्ण मराठवाड्यात पसरलेलं आहे.

60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

धरण भरत आल्यामुळे औरंगाबादकर खुश आहेत. औरंगाबादमधील जयभवानी नगरात राहणाऱ्या अनिता तांबे सांगतात, “धरणातच पाणी नसल्यामुळे आठ-आठ दिवस पाणी येत नव्हतं. शिक्षिका असल्यामुळे शाळेत जाण्याची घाई आणि पाण्याचं वेळापत्रकही निश्चित नसल्याने प्रचंड तारांबळ झाली. पण धरणात पुरेसा पाणीसाठी झाल्यामुळे एक दिवसाआड पाणी मिळतंय. पाण्यासाठीची कसरत आता संपली आहे.”

धरण भरत आल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. नाथसागरापासून काही अंतरावर शेती असलेले सय्यद अजहर सांगतात, “शेतात डाळिंब आणि इतर काही मोसमी पिकं घेतली जातात. डाळिंबासाठी शेतात चार विहिरी खोदल्या, एक शेततळंही आहे. पण धरणातच पाणी नसल्यामुळे शेती कशी टिकवायची असा प्रश्न होता. पण धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने आता समाधान आहे.”

नाथसागरावर अवलंबून क्षेत्र

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.

औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

जायकवाडी धरणात सध्या 33926 क्युसेकने आवक सुरु आहे. तर धरणातून उजव्या कालव्यात 900 क्युसेक्स, डाव्या कालव्यात 400 क्युसेक्स आणि पैठण जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील विहिरींनाही मोठा फायदा होणार आहे.

मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा कायम

जायकवाडी भरलं म्हणजे मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या क्षेत्राचा पाणीप्रश्न मिटतो. पण यामुळे संपूर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला असं म्हणता येणार नाही. लातूर, उस्मानाबाद आणि बीड यांसारखे जिल्हे अजूनही प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मराठवाड्याला आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.