Jayant Patil: ‘ते’ लोक आमच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत, जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?
Opposition March against Election Commission: आज मुंबईत विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी विरोधक मतदार यांद्यांवर आक्षेप घेत आहेत. आज मुंबईत विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
सत्ताधाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
जयंत पाटील म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगासोबत आमची चर्चा झाली. ही चर्चा सर्व पक्षांनी मिळून केली आहे. त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राज्यात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहेत, या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं आहे. सत्तेत असणारे लोकही या मोर्चात सहभागी झाले तरीही ना नाही. पण अशा चुकीच्या आणि चोरीच्या वाटेने मतदार यादीत मतदार घुसडलेल्या यादीचा ज्यांना फायदा होतो, ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाहीत.
आमचा मोर्चाला पाठिंबा
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘ज्यांना या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होत आहे, त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे. म्हणून 1 तारखेला सर्व पक्षांच्या वतीने मुंबईत मोर्चा निघत आहे. याला शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चाला पाठिंबा देत आहे.’
जनतेने मोर्चात सहभागी व्हावं…
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘अशी अनेक उदाहरणे आहेत, जी आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाहीत, आमची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चूका दुरूस्त कराव्यात. निवडणूक आयोगाने आम्ही इतके आक्षेप घेतले, यावर आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याला आयोग उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. ज्या लोकांचे वय, पत्ते चुकलेले यावर आयोग काय प्रक्रिया राबवणार हे जाहीर करावं. ज्या लोकांची नावे किंवा वय दुरूस्त केले यासाठी काय प्रक्रिया आयोगाने जाहीर करावं. आगामी काळात आम्ही याद्यांमधील इतरही दोष जनतेसमोर मांडणार आहोत. राज्यात ज्या लोकांना लोकशाहीबाबत आस्था आहे त्या लोकांनी लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.’
