हे धर्मस्वातंत्र्य नव्हे तर…मी स्वाभिमानी हिंदू पण…धर्मांतरविरोधी विधेयकावर बोलताना आव्हाडांनी सरकारला घेरलं!

जितेंद्र आव्हाड यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकाला विरोध केला. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला पुन्हा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हे धर्मस्वातंत्र्य नव्हे तर...मी स्वाभिमानी हिंदू पण...धर्मांतरविरोधी विधेयकावर बोलताना आव्हाडांनी सरकारला घेरलं!
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 7:52 PM

Jitendra Awhad : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक सादर केले आहे. या विधेयकावर आज (16 मार्च) विधानसभेत सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. तसेच बेकायदा धर्मांतर घडवून आणले जात असेल तर त्यासाठी काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सांगितले आहे. ठाकरे गटाने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तसेच या विधेयकात कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करण्यात आलेलं नाही, अशीही भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर गंभीर प्रश्चचिन्ह उपस्थित करत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कोणी संवैधानिक पद्धतीने धर्मांतर केले तर तुम्ही त्याला मारझोड करणार का? असा रोखठोक सवाल आव्हाड यांनी केला.

धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणणं म्हणजेच…

विधानसभेत बोलताना आव्हाड यांनी सरकावर सडकून टीका केली. या विधेयकाच्या हेतुला आमचा विरोध आहे. ⁠धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणणं म्हणजेच संविधानाला छेद देणं आहे. ⁠बुद्धांनी केलेलं धर्मांतर हे पहिलं धर्मांतर आहे. ⁠मग बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांना ही आता जेलमध्ये जावा लागल असतं, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

मी धर्म बदलण्याचं ठरवलं आणि तो…

या विधेयकानुसार धर्म बदलण्याचे ठरवले तर त्याला थेट गुन्हेगारच ठरवले जात आहे. मी धर्म बदलणार आहे, असं जाहीर केलं की त्याच्या कुटुंबीयांवरती दबाव टाकला जाणार आहे. समजा मी धर्म बदलण्याचं ठरवलं आणि तो लगेच बदलला तर तो माझा वैयक्तिक अधिकार आहे. यामध्ये सरकार कसं काय येऊ शकतं. माझ्यामध्ये येण्याचा सरकारला काय अधिकार आहे? असा सवालही त्यांनी केला.

मी स्वाभिमानी हिंदू, मी सच्चा….

तसेच, भारताचा एक इतिहास आहे. जेव्हा-जेव्हा धर्माविरोधात उभे राहण्याची वेळ आलीस तेव्हा-तेव्हा लोक त्याविरोधात उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. या विधेयकाच्या माध्यमातून धर्माला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्यांनी केला. मी स्वाभिमानी हिंदू आहे. मी सच्चा हिंदू आहे. वसुधैव कुटुंबम मानणारा मी हिंदू आहे. मी ज्या समाजात जन्मालो आलो होतो, त्या समाजात माज्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हते. आमची ही भळभळणारी जखम आहे, हे बोलायलाही आव्हाड विसरले नाहीत.

धर्मावर पुन्हा एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न

जबरदस्तीने धर्मांतर व्हायला नको. याच मताचे आम्हीदेखील आहोत. पण या कायद्याच्या मागे जो धर्मस्वातंत्र्याचा उल्लेख केला जातोय ते असत्य आहे. हे धर्मस्वातंत्र्य नाही. धर्मावर पुन्हा एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कुणी काय करावं, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कुणाच्याही बापाने दिलेला नाही. संविधानावर नियंत्रण आणण्यात येत असेल तर ते आम्हाला अमान्य आहे, अशी रोखठोक भूमिकाही आव्हाड यांनी घेतली.

Follow Us