Abhishek Ghosalkar | सरकारला लाज कशी वाटत नाही ? अभिषेक घोसाळकर हत्येनंतर विरोधक संतापले, आव्हाड, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर यावेळी गोळीबार करण्यात आला आहे. दहीसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस भाई याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. हत्येच्या या खळबळजनक घटनेनंतर विरोधी पक्ष संतापला असून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

Abhishek Ghosalkar | सरकारला लाज कशी वाटत नाही ? अभिषेक घोसाळकर हत्येनंतर विरोधक संतापले, आव्हाड, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
| Updated on: Feb 09, 2024 | 7:49 AM

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत गेल्या चार दिवसांत गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. राजकारणात आता गोळीबाराच्या घटनांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच काल, गुरूवार संध्याकाळी चक्क महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच गोळीबार झाला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर यावेळी गोळीबार करण्यात आला आहे. दहीसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस भाई याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

मुंबईत दिवसढवळ्या घडलेल्या या घटनेचे सर्वत पडसाद उमटले असून राजकीय वातावरणही तापले आहे. हत्येच्या या खळबळजनक घटनेनंतर विरोधी पक्ष संतापला असून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार ?

X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवरून ट्विट करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘ फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधी वर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ? ‘ असा सवाल त्यांनी विचारला. ‘ शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. एकामागून एक अशा गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का ? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अश्या बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे.राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का? ‘ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

 

सरकारला लाज कशी वाटत नाही ! जितेंद्र आव्हाडही संतापले

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही या घटनेमुळे संतापले असून त्यांनीही ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडले. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे.इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

‘महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात ! ‘

‘दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे ! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच आहे. ‘ असे लिहीत आव्हाड यांनी सरकारवर कडाडून टीका केला.

 

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई दोघांचा मृत्यू

हीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. त्याने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात. त्यानंतर घोसाळकर यांचं बोलणं संपल्यानंतर ते जागेवरुन उठलं आणि त्यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार करण्यात आला.