‘जात बदनाम होतीये, गुन्हे करायचे अन्…’; आव्हाडांचा पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता?' असा सवाल यावेळी आव्हाड यांनी केला.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय आरोप -प्रत्यारोप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे, याच्यावर हल्ले झाले, त्याच्या हत्या झाल्या. जा लोकांचा छळ झाला ते लोक वंजारी नाहीत का? तुम्ही लोकांचा छळ केला. तुम्ही लोकांना गुलाम केलं, त्यांना राजकारणासाठी वापरलं’ असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाचं ऐकत नाही. असे तर इन्सपेक्टर आहेत. शासकीय यंत्रणा पोखरली जात आहे. खरा आका धनंजय मुंडे हेच आहेत. 11 वर्ष एकच पोलीस एका ठिकाणी कसा? आका आणि काका दोन्ही इथेच बसतात, काहीही होणार नाही, असा हल्लाबोल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दमानियांचा हल्लाबोल
दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पीसी घेतली. मला वाटेल ती नावे ठेवली. दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर चाललं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझं काही नाव ठेवलं तरी मला फरक पडत नाही, बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, मामीची जमीन बळकवायची हे सगळं सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी दमानिया यांनी केला आहे.