मराठी वि. अमराठी वाद : “मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका”, अमराठी व्यावसायिकाच्या वक्तव्याने पुन्हा तापलं वातावरण, Video Viral
कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटला आहे. एका अमराठी किराणा दुकानदाराने 'मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका' असे आवाहन केल्याने तणाव वाढला आहे. हातावर पोट असलेल्या मराठी भाजी विक्रेत्या महिलेच्या रोजगारावर यामुळे गदा आली आहे. मनसे, शिवसेना आणि भाजपने या प्रकाराचा तीव्र निषेध करत अमराठी दुकानदाराला समज दिली असून, मराठी लोकांच्या कामात अडथळा न आणण्याचा इशारा दिला आहे.

कल्याणच्या डी-मार्टमध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी (रविवार) एका अमराठी महिलेने मराठी भाषा बोलण्यास नकार देत मराठी लोकांना उद्देशून घाणेरडे शब्द वापरले. त्यावरून मोठा गदारोळ झाला, वादही पेटला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत त्या महिलेला जाब विचारला आणि माफी मागण्यासही भाग पाडले. हा सगळा प्रकार अद्याप ताजा आहे, वातावरण गरम असतानाच आता पुन्हा कल्याणामध्य़ेच मराठी वि. अमराठी असा वाद पेटला आहे.
कल्याणच्या चिंचपाडा भवानीनगरमध्ये मराठी वि. अमराठी असा वाद झाला आहे. तेथे एका अमराठी व्यावसायिकाने अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका” असं त्या व्यावसायिकाने म्हटल्याचं समोर आलं असून त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. कल्याण चिंचपाडा भवानीनगरात मराठी महिलेला विरोध करण्यात आला आहे. अमराठी किराणा व्यावसायिकाकडून भाजी विक्रीस अडथळा निर्माण करण्यात आला. “मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका” असं त्याने म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्यावसायिकाला दिली समज
हे प्रकरण समोर येताच मनसे पदाधिकारी , शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक मारली. अमराठी व्यावसायिकाचे किराणा मालकाचे दुकान असून त्यांनी दुकानाबाहेर भाजीची गाडीही लावली आहे. त्याच परिसरात आधीच एका मराठी महिलेचे भाजीचे दुकान आहे. मात्र त्या अमराठी दुकानदाराने त्या मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असे आवाहन केले, हातावर पोट असलेल्या त्या महिलेच्या दुकानातून भाजी घेण्यास गिऱ्हाईकांना विरोध केल्याचे समोर आले, त्यामुळे त्या महिलेने उदरनिर्वाह कसा करायचा,पोट कसं भरायचा असा सवाल उपस्थित झाला.
त्यानंतर मनसे,शिवसेना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धडक देऊन अमराठी व्यावसायिकाला समज दिली. मराठी माणसाचा अपमान करायचा नाही, त्यांच्या कामात ढवळाढवळ करून काम रोखायचं नाही. तुमचं किराणा मालाचं दुकान आहे तर ते चालवा, भाजीची गाडी टाकून त्या दुसऱ्या महिलेचं काम का लुबाडता, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी त्यांना विचारला. उद्यापासून फक्त किराणा सामान विकायचं, भाजी नाही, तुम्ही तुमचं काम करा, त्या महिलेला तिचं काम करून पैसे मिळवू देत अशी समजही कार्यकर्त्यांनी त्यांना दिली. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
