तब्बल 38 वर्षांची साथ सोडली…, भाजप-शिवसेनेला खिंडार; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मोठी खेळी
कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असून शेकडो पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. घराणेशाही आणि निष्ठावंतांच्या गळचेपीमुळे नाराज कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता शहरात राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही सत्ताधारी पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष आणि अनुसूचित सेलच्या सचिवांसह शिंदे गटाचे अनेक विभागप्रमुख व शाखाप्रमुखांचा समावेश आहे. गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी आपली खंत व्यक्त केली. तसेच भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या सरचिटणीसांनी थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला.
थेट पक्षनेतृत्वावर निशाणा
“आम्हाला ‘मन की बात’ सांगणारे नकोत, तर लोकांच्या समस्या ऐकणारे ‘जन की बात’ करणारे नेते हवे आहेत. पक्षात आता फक्त घराणेशाही उरली असून सामान्य कार्यकर्त्याला केवळ सतरंज्या उचलण्यासाठी वापरले जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ विभागप्रमुखांनी याबद्दल भावना व्यक्त केल्या. “३८ वर्षे आम्ही शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. मात्र, सध्याच्या नव्या समीकरणात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. ज्यांनी पक्षाला शून्यातून उभे केले, त्यांना डावलून आयात केलेल्या लोकांना महत्त्व दिले जात आहे. म्हणूनच स्वराज्य आणि सन्मानासाठी आम्ही काँग्रेसचा हात धरला आहे, असे ज्येष्ठ विभागप्रमुखांनी म्हटले.
लवकरच मोठा धमाका होईल
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी विरोधकांना थेट चॅलेंज दिले. कल्याणमध्ये आता वाऱ्याची दिशा बदलली आहे. भाजप-शिवसेनेच्या भूलथापांना जनता कंटाळली आहे. रस्त्यांचे खड्डे, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि सत्तेचा माज यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आमचे नियोजन पक्के आहे; ज्याप्रमाणे टीमचा कॅप्टन खंबीर असेल तर वर्ल्ड कप जिंकता येतो, त्याचप्रमाणे आम्ही ही महानगरपालिका जिंकणारच. अनेक माजी नगरसेवकही आमच्या संपर्कात असून लवकरच मोठा धमाका होईल,” असा दावा राजाभाऊ पातकर यांनी केला.
एकीकडे महायुतीचे नेते मोठे मेळावे घेऊन ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता पक्ष सोडून जात असल्याने युतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत आपण केवळ स्पर्धेत नसून किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
